कोरोनाची संख्या वाढत असल्याने एप्रिल २०२१ मध्ये कोविड-१९ अंतर्गत विविध संवर्गांतील पदांची नियुक्ती करण्यात आली होती. यामध्ये वैद्यकीय अधिकारी, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, औषध निर्माता, ई.सी.जी. तंत्रज्ञ, एक्स-रे टेक्निशियन, स्टोअर ऑफिसर, डाटा एन्ट्री ऑपरेटर, अधिपरिचारिका, कक्षसेवक अशी पदे भरण्यात आली होती; परंतु त्यांना ३१ जुलै २०२१ कार्यमुक्त करण्यात आले आहे. ऑगस्ट महिन्यामध्ये कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे आणि अवघ्या ८ ते १० दिवसांतच पंढरपुरात संचारबंदी करण्याबाबत जाहीर करण्यात आली आहे. १३ ऑगस्टपासून १० दिवसांसाठी संचारबंदी करण्यात आली आहे. सध्या पंढरपुरातील सर्व रुग्णालयांत कोरोनाचे रुग्ण आहेत. खासगी रुग्णालयात उपचारासाठी गेल्यानंतर लाखोंचा खर्च करावा लागत आहे. त्यामुळे कोरोनाबरोबर इतर आजारांसाठीदेखील गाेरगरीब नागरिक उपजिल्हा रुग्णालयात येत असतात. गोरगरीब रुग्णांना योग्य व वेळत उपचार मिळणे गरजेचे आहे तसेच कोरोनाचे रुग्ण वाढत आहे. यासाठी अधिकचे मनुष्यबळ आवश्यक आहे.
---
उपजिल्हा रुग्णालयात कोविड-१९ साठी नेमण्यात आलेले मनुष्यबळ कमी करण्यात आले आहे. परंतु पुन्हा रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यामुळे मनुष्यबळ वाढवून देण्यात यावे, अशी मागणी वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे करण्यात आली आहे.
- अरविंद गिराम, वैद्यकीय अधिकारी, उपजिल्हा रुग्णालय
----
उपजिल्हा रुग्णालयात मंगळवेढा, सांगोला आदी परिसरातील रुग्ण उपचारासाठी येतात. यामुळे या ठिकाणी आवश्यक मनुष्यबळ असणे गरजेचे आहे. आरोग्य कर्मचारी कमी करू नका, म्हणून सिव्हिल सर्जन व जिल्हाधिकारी यांना सांगितले होते. त्यांनी कर्मचारी कमी केले तरी पुन्हा घेण्यात येतील, असे सांगितले होते. परंतु कर्मचाऱ्यांची नेमणूक केली नाही. त्यामुळे पुन्हा त्यांनी कर्मचारी वाढवून द्यावेत, अशी मागणी करणार आहे.
- समाधान आवताडे, आमदार
---
कोरोनाबरोबरचा लढा कसा लढणार
संचारबंदीच्या नावाखाली व्यावसायिकांना प्रतिबंध केला जातोय; परंतु ज्या ठिकाणी प्रशासनाची मुख्य भूमिका आहे, त्याच आरोग्य विभागातील मनुष्यबळ कमी केले गेले आहे. आराेग्य कर्मचाऱ्यांविना प्रशासन कोरोनाचा लढा कसा लढणार आहे. त्याचबरोबर ग्रामीण भागातील लोक शहरात येत आहेत, शहरातील लोक बाहेर जात आहेत. कुठेही नाकाबंदी नाही, ही कसली संचारबंदी आहे, असे मत व्यापारी महासंघाचे अध्यक्ष सत्यविजय मोहळकर यांनी सांगितले.
---
यांना कार्यमुक्त
वैद्यकीय अधिकारी - ४, प्रयोगशाळा तंत्रज्ञ - १, औषध निर्माता - १, ई.सी.जी. तंत्रज्ञ - १, एक्स-रे टेक्निशियन - १, स्टोअर ऑफिसर - १, डाटा एन्ट्री ऑपरेटर - १, अधिपरिचारिका - ९, कक्षसेवक - ४
फोटो ::: उपजिल्हा रुग्णालय
----