सोलापूर : दहावी परीक्षेचा निकाल शनिवारी जाहीर करण्यात आला. त्यानंतर लगेचच आई-वडिलांच्या अपेक्षेप्रमाणे परीक्षेत मार्क्स मिळविलेल्या विद्यार्थ्यांचा ओढा नवीन मोबाईल खरेदी करण्याकडे लागला आहे. ओ पप्पा.. मला तोच मोबाईल हवाय.. तुम्ही मला प्रॉमिस केला होतात.. असाच आग्रह यशवंतांनी पालकांकडे मोबाईल दुकानात धरला असल्याचे दिसून येत होते.
बहुतेक पालकांनी आपला मुलगा-मुलगी दहावी परीक्षेत किमान ८५ टक्क्यांपेक्षा जास्त गुण मिळवावेत, अशी अपेक्षा ठेवली होती. मुलांच्या यशाकरिता आवश्यक असलेल्या सर्व शैक्षणिक गरजा पालकांकडूनही पुरविण्यात आल्या. मोबाईलमुळे अभ्यासात व्यत्यय येत असल्याने परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर मोबाईल घेऊन देण्याचे आश्वासन पालकांनी मुलांना दिले होते. त्यामुळेच नवी पेठ, सात रस्ता, विजापूर रोड आदी परिसरातील मोबाईल दुकानांत विद्यार्थी व पालकांची गर्दी दोन दिवसांत वाढल्याचे दिसून येत आहे.
परीक्षेचा निकाल शनिवारी दुपारी जाहीर झाल्यानंतरच मुलांनी मोबाईलसाठी आईबाबांकडे आग्रह धरल्याने याच दिवशी सायंकाळपासून मोबाईल दुकानांत गर्दी दिसून येत होती.. रविवारी सुट्टीचा दिवस असतानाही मोबाईल खरेदी करताना विद्यार्थी आणि पालकांनी चांगलीच गर्दी केल्याचे दिसून आले. अकरावी प्रवेशप्रक्रिया पूर्ण होईपर्यंत ही गर्दी राहण्याचा अंदाज मोबाईल विक्रेत्यांकडून करण्यात येत आहे.
फुल्ल एचडी, हाय बॅटरीच्या मोबाईलला पसंती : शेख ४- एचडी, हाय बॅटरी क्षमता असणाºया मोबाईलची खरेदी करण्यास त्यांच्याकडून पसंती देण्यात येत आहे. ६ जीबी रॅम, १२८ अंतर्गत मेमरी क्षमता व पाच हजार एमएच बॅटरी क्षमता असलेल्या गुणवत्तायुक्त मोबाईल खरेदीस अधिक पसंती मिळत आहे. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक कामासाठी उपयोगी ठरणारा मोबाईल घेण्याचा कलही दिसून येत असल्याची माहिती हुमा मोबाईल शॉपीचे मालक हिशाम शेख यांनी दिली.
स्वस्त व लेटेस्ट मोबाईल खरेदीस पसंती : फाटे- सर्वसामान्य कुटुंबातील यश मिळविलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांची मोबाईल खरेदीसाठी गर्दी होत आहे. सर्वसामान्य पालकांना परवडेल अशा किमतीत असणाºया लेटेस्ट मॉडेलच्या मोबाईल खरेदीसही पालकांची पसंती मिळत आहे. अनेक सुविधा उपलब्ध असलेला मोबाईल मिळत असल्याने विद्यार्थीही आनंदी होताना दिसून येत असल्याची माहिती संजय इन्टरप्रायझेसचे मालक पंकज फाटे यांनी दिली.
दहावी परीक्षेत चांगले गुण मिळाल्यानंतर चांगला मोबाईल घेऊन देण्याचा शब्द मुलाला दिला होता. परीक्षेत चांगले गुण मिळाल्याचा आनंद आहेच, त्यात मुलाला मोबाईल देण्याचा दिलेला शब्द पूर्ण करतानाही आनंद होत आहे. - तुकाराम कांबळे, पालक