निमित्त विकास कामाच्या भूमिपूजनाचे... स्मशानातही फलक हार्दिक स्वागताचे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 1, 2021 06:19 PM2021-11-01T18:19:41+5:302021-11-01T18:19:47+5:30
नगरसेवकांनी ठाेकली भाषणे : महापालिका निवडणुकीची अशीही तयारी
सोलापूर : महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरात विकासकामांच्या भूमिपूजनाचा जाेर आहे. रविवारी १४ स्मशानभूमीतील विविध कामांचे भूमिपूजन करण्यात आले. काही ठिकाणी साध्या पध्दतीने भूमिपूजन झाले. देगाव स्मशानभूमीत ‘मान्यवरांचे हार्दिक स्वागत’ असे फलक पाहायला मिळाले, तर काही ठिकाणी नगरसेवकांची राजकीय भाषणे ऐकायला मिळाली.
महापालिका आणि स्मार्ट सिटी याेजनेतून १४ स्मशानभूमीत आवश्यक त्या ठिकाणी प्रवेशद्वार, संरक्षक भिंत, गॅस दाहिनी, स्वच्छतागृह, अंतर्गत काँक्रिटचे रस्ते, सौर पथदिवे, प्रतीक्षालय, कुपनलिका, पंप, बर्निंग शेड, पेव्हर ब्लाॅक, पथदिवे, पाण्याची टाकी, विद्युतदाहिनी आदी कामे करण्यात येणार आहेत. या कामांचे भूमिपूजन महापाैर श्रीकांचना यन्नम यांच्या हस्ते झाले. त्यानंतर विविध प्रभागातील कामांचे उद्घाटन झाले. या उद्घाटन कार्यक्रमांसाठी नगरसेवकांनी जंगी तयारी केली हाेती. नेत्यांचे फलकही लावले हाेते. माेदी स्मशानभूमीत नगरसेवकांनी राजकीय भाषणे केली. देगाव स्मशानभूमीत आमदार, गटनेते, अधिकारी यांच्या हार्दिक स्वागताचा फलक पहायला मिळाला. यावर बरीच कुजबुजही झाले.
या कार्यक्रमांना सभागृह नेते शिवानंद पाटील, विरोधी पक्षनेते अमोल शिंदे, महापालिका आयुक्त पी. शिवशंकर, माजी आमदार नरसय्या आडम, गटनेता आनंद चंदनशिवे, रियाज खरादी, चेतन नराेटे, ज्येष्ठ नगरसेवक महेश कोठे, नगरसेवक संजय कोळी, देवेंद्र कोठे, गणेश वानकर, अविनाश बोंमड्याल, नागेश वल्याळ, नगरसेविका रामेश्वरी बिर्रु, राधिका पोसा, कुमुद अंकराम, राजू पाटील, जनार्दन कारमपुरी, अशोक इंदापुरे आदी मान्यवर उपस्थित होते. या कामांसाठी स्मार्ट सिटी कंपनीने निधी दिला आहे; परंतु, महापालिका आणि स्मार्ट सिटीतील वादाच्या पार्श्वभूमीमुळे स्मार्ट सिटीचे अधिकारी या कार्यक्रमाकडे फिरकले नाहीत, असे सांगण्यात आले.
येथे सुरू झाले काम
कुमठे स्मशानभूमी, मोदी स्मशानभूमी, मोदी ख्रिश्चन स्मशानभूमी, देगाव मुस्लीम कब्रस्तान, जुना कारंबा नाका स्मशानभूमी, जुना पुना नाका स्मशानभूमी, भावसार स्मशानभूमी, रूपाभवानी रोड लिंगायत स्मशानभूमी, रूपाभवानी रोड हिंदू स्मशानभूमी, अक्कलकोट रोड जडे साहेब मुस्लीम स्मशानभूमी, अक्कलकोट रोड पद्मशाली स्मशानभूमी. या कामांसाठी २२ काेटी रुपयांचा खर्च निश्चित करण्यात आला आहे.
----------