आप्पासाहेब पाटील
सोलापूर : घर खरेदीदारांसह बांधकाम व्यावसायिकांना राज्य सरकारने अखेर मोठा दिलासा दिला आहे. घराची नोंदणी आणि मुद्रांक शुल्क भरण्यासाठी आता ग्राहकांना तसेच बांधकाम व्यावसायिकांना नोंदणी कार्यालयात जाण्याची गरज नाही. कारण आता बांधकाम व्यावसायिकच ऑनलाइन नोंदणी आणि मुद्रांक शुल्क भरण्याची प्रक्रिया पार पाडणार आहेत. बांधकाम व्यावसायिकाला कुठेही न जाता ऑफिसमध्ये बसूनच हे काम करता येणार आहे.
घर खरेदी केले की त्याची नोंदणी करावी लागते आणि ही प्रक्रिया खूपच किचकट व वेळखाऊ आहे. यासाठी दुय्यम निबंधकांच्या कार्यालयात बांधकाम व्यावसायिक व वकिलासोबतच अनेक तास ताटकळत राहावे लागते. यापासून सुटका व्हावी व नोंदणीची प्रक्रिया सुलभ व सोपी करण्यासाठी नोंदणी व मुद्रांक विभागाने एक वेगळी शक्कल लढविली आहे. जानेवारीपासून राज्यातील सर्वच जिल्ह्यांतील बांधकाम व्यावसायिकांना आता घर नोंदणीचे अधिकार दिले आहेत. त्यानुसार बांधकाम व्यावसायिकच आता घरांची नोंदणी करणार आहेत. त्यामुळे सर्वसामान्यांचा वेळ वाचणार आहे. शिवाय दुय्यम निबंधक कार्यालयात मारावे लागणारे हेलपाटे थांबणार आहेत.
-----------
बिल्डरांच्या संख्येवर एक नजर
- - सोलापूर शहर - १०० ते १५०पर्यंत
- - सोलापूर ग्रामीण - ५० ते ७०पर्यंत
-------------
अशी आहे नोंदणी प्रक्रिया
- - बांधकाम व्यावसायिकांनी रेराचे प्रमाणपत्र घेतल्यानंतर त्यांचे फ्लॅट, दुकाने यांचे पूर्वमूल्यांकन करावे लागणार आहे.
- - त्यानंतर त्याचे एक नमुना दस्त तयार केले जाईल. हे दस्त या प्रणालीत अपलोड केले जाईल.
- - या दस्तात ग्राहकाचे नाव, किंमत आदी बाबी नव्याने टाकल्या जातील. मात्र, त्यापूर्वी या खरेदीसाठीचे मूल्यांकन केले जाईल.
- - त्यानंतर त्याची स्टॅम्प डयुटी भरावी लागणार आहे. त्यानंतर बांधकाम व्यावसायिक व ग्राहकाच्या आधारमार्फत त्या दस्ताचे प्रमाणीकरण केले जाईल.
------------
बिल्डरांसाठी काय आहेत अटी?
- - संबंधित प्रकल्प रेरामध्ये नोंदणी केलेला असावा.
- - किमान २० घरे, दुकाने विक्रीला असावीत.
- - पूर्व मान्यता केलेले मूल्यांकन असावे, असे बंधनकारक करण्यात आले आहे.
----------
सध्या मोठ्या बांधकाम व्यावसायिकांना या उपक्रमात सहभागी करून घेण्यात येत आहे. या नव्या प्रक्रियेमुळे ग्राहक, बांधकाम व्यावसायिक व वकील यांना दुय्यम निबंधकांच्या कार्यालयात जाण्याची गरज भासणार नाही. ही गर्दी कमी झाल्यास अन्य सेवा चांगल्या प्रकारे देता येतील.
- सुनील फुरडे, अध्यक्ष, क्रेडाई, महाराष्ट्र राज्य
-----------