सोलापूर : चालू महिन्यात कोणत्या तारखेला किती धान्य घेतलात?, तुमच्या रेशन कार्डवर किती धान्याची उपलब्धता आहे?, याची माहिती आता धान्य वितरण झाल्याबरोबर तुमच्या मोबाईलवर मिळेल. मोबाईल क्रमांकाची नोंदणी दुकानदाराकडे किंवा पुरवठा विभागाकडे केल्यानंतर दर महिन्याला एसएमएस येत राहील. लाभार्थीनी या उपक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन शहर पुरवठा अधिकारी सुमित शिंदे यांनी केले आहे.
रेशन दुकानातील धान्य चोरी रोखण्यासाठी शासनाने सदर सेवा सुरु केली आहे. सोलापूर शहरात आधार फीडिंगचे काम शंभर टक्के पूर्ण झाले असून आता मोबाईल नोंदणीचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. आधार फीडिंग झाल्यामुळे शंभर टक्के धान्याची चोरी थांबली आहे. आता यात आणखीन पारदर्शकता येण्यासाठी लाभार्थींना त्यांच्या मोबाईल नंबरवर नोंदणी केलेल्या मोबाईल रेशन धान्याची सविस्तर माहिती मिळणार आहे.