सोलापूर : चविष्ट अन् खमंगदार भज्यासाठी सोलापूर प्रसिध्द आहे. भज्याचे विविध प्रकारही येथील अनेक दुकानात उपलब्ध आहेत; पण खवय्यांकडून कांदा भज्यांची मागणी मोठ्या प्रमाणावर आहे. ग्राहकांची ही आवड पुरवणं हल्ली दुकानदारांना मुश्किल होऊन गेलंय कारण वाढलेले कांद्याचे दर! ग्राहकांनाही हे भजी घेणं खिशाला परवडणारे नाही, हेही दररोजच्या घटत्या मागणीवरून स्पष्ट झालेले आहे. तरीही काही ग्राहक मात्र कांदा भजीची मागणी आवर्जुन करतात. या ग्राहकांसाठी मात्र दुकानदारांना कांद्याच्या ठोक बाजारभावानुसार दररोज भजी प्लेटच्या दराच्या पाट्या बदलाव्या लागत आहेत..भजी सेंटर व्यावसायिकांनीच ही माहिती ‘लोकमत’ला दिली.
शहरात नवीपेठ, शिवाजी चौक,रेल्वे लाईन, पंचकट्टा, भैय्या चौक, बाळीवेस, कुंभारवेस, जोडबसवण्णा चौक, भद्रावती चौक, कन्ना चौक, दाजीपेठ, विद्यानिकेतन प्रशालेजवळ, शांती चौक पाणी टाकी, अशोक चौक आदी भागात भजीचे प्रसिद्ध स्टॉल आहेत. दररोज या ठिकाणी भजी व कांदा भजी खाण्यासाठी लोकांची गर्दी असते. कांदा भजी, कांदा पकोडा व भजी सोबत कांदा व कांदा पात दिली जाते. ग्राहक आवर्जून याची मागणी करतात; मात्र नोव्हेंबरमध्ये साधारणत: ५ ते ६ हजार रुपये क्विंटल दराने विकल्या जाणाºया कांद्याने अचानक २0 हजार रुपयांचा भाव घेतला. ४0 ते ५0 रुपये दराने विकला जाणारा कांदा हा अचानक २00 रुपये किलोवर गेला. अचानक कांदा वधारल्याने भजी विक्रेत्यांपुढे मोठा प्रश्न पडला.
बहुतांश भजी विक्रेत्यांनी दरम्यानच्या काळात कांद्याची भजी केलीच नाही. काहींनी कांदा कमी आणि पात जास्त हा फॉर्म्युला वापरला. बºयाच जणांनी कांदा वापरायचा मात्र दरात वाढ करायची असा निर्णय घेतला. १0 रुपये प्लेट असलेली कांदा भजी १५ रुपयाला केली. १५ रुपयांचा कांदा पकोडा २0 ते २५ रुपयाला केला. ज्याप्रमाणे कांद्याच्या दरात चढ-उतार होऊ लागली त्याप्रमाणे कांदा भजीचे दरही कमी-जास्त होत आहेत.
खवय्येही विचारत आहेत भजीचे दर...
- - कांदा वाढल्याने हॉटेलमध्ये, भजी सेंटरवर भजी घेण्यासाठी येणारे ग्राहकही पहिल्यांदा कांदा भजीचे दर विचारत आहेत.
- - बहुतांश व्यापारी कांद्यामध्ये पातीचा जास्तीत जास्त वापर करीत आहेत. कांदा पकोडा दीडपट व दुप्पट दराने विक्री करीत असल्याची माहिती समोर आली़
- - काही व्यापारी ग्राहकांची नाराजी नको म्हणून कांदा भजीच करीत नाहीत. केवळ मिरची भजी, डिस्को भजी, बटाटा भजी तयार करत आहेत. कांद्याची मागणी झाल्यास त्या ग्राहकाला स्पष्टपणे कांदा नाही असे सांगितले जात आहे.
गेल्या बारा दिवसात कांद्याचा दर अचानक वाढल्याने आम्हाला कांदा पकोडा व कांद्याच्या भजीचे दर वाढवावे लागले. भाव वाढल्याने व्यवसायिकावर परिणाम झाला आहे. मला दररोज २0 ते ३0 किलो कांदा लागतो, मात्र भाव वाढल्याने दरात दररोज बदल करावा लागतोय- भानुदास निकम, भजी व्यावसायिक