सोलापूर : अनेक दिवसानंतर विद्यार्थी शाळेत जाऊ लागले आहेत. पण, अनेक विद्यार्थ्यांची सवय मोडल्यामुळे प्रत्येक तासानंतर बाहेर जाण्यासाठी विद्यार्थी शू व पाणी पिण्याचे कारण देत वर्गाबाहेर पडत आहेत. आणि एक विद्यार्थी बाहेर पडल्यानंतर बाहेर जाण्यासाठी रांगा लागतात, असा अनुभव शिक्षकांना येत आहे.
चार ऑक्टोबरपासून शहरामध्ये आठवी ते बारावीचे वर्ग आणि ग्रामीण भागात पाचवी ते बारावीचे वर्ग भरण्यास सुरुवात झाली आहे. पण, अनेक दिवसानंतर शाळेत येत असल्यामुळे मुले शाळा भरण्याच्या आगोदरच शाळेत थांबत आहेत. तसेच वर्ग जरी भरत असले तरी पिटीचे तास आणि खेळाचे तास कधी सुरू होणार असा प्रश्न विद्यार्थ्यांकडून वारंवार विचारला जात आहे.
तसेच, मागील दीड वर्षांपासून ऑनलाईन शिक्षण सुरू असल्यामुळे विद्यार्थी मोबाईल घेऊन घरात फिरत अभ्यास करत होते. पण, वर्गात आल्यानंतर एका तासापर्यंत विद्यार्थ्यांचे वर्गात लक्ष राहते, त्यानंतरच त्यांची चुळबुळ सुरू होते. पण, आता विद्यार्थ्यांना सवय होत आहे. असे शिक्षकांचे मत आहे.
वर्गात जागा बदलता येत नाही
कोरोना विषयी विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती असून विद्यार्थी हे नियम पाळत असतात. तसेच वर्गात विद्यार्थ्यांची बैठक व्यवस्था निश्चित करण्यात आली आहे. पण पूर्वी कंटाळा आल्यानंतर विद्यार्थी बेंच बदलत होते. पण, आता ही संधी नसल्यामुळे वर्गात चुळबुळ सुरू असते.
वर्गात जागा बदलता येत नाही
कोरोना विषयी विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती असून विद्यार्थी हे नियम पाळत असतात. तसेच वर्गात विद्यार्थ्यांची बैठक व्यवस्था फिक्स करण्यात आली आहे. पण पूर्वी कंटाळा आल्यानंतर विद्यार्थी बेंच बदलत होते. पण, आता ही संधी नसल्यामुळे वर्गात चुळबुळ सुरू असते.
लिहिण्याची अडचण
ऑनलाईन शिक्षणामुळे विद्यार्थ्यांची लिहिण्याची सवय कमी होत होती. यामुळे अनेक शाळांनी विद्यार्थ्यांना लिहिण्याची सवय ठेवण्यास सांगण्यात येत होते. यामुळे अनेक विद्यार्थ्यांचा वर्गात लिहिण्याचा वेग चांगला होता. असे असले तरी पूर्वीच्या तुलनेत हा वेग खूप कमी झाला आहे. तर, काही विद्यार्थ्यांना जोडाक्षरे लिहिताना अडचण येत होती, तर काही विद्यार्थ्यांना गणिताची आकडेमोड जमत नसल्याचे काही शिक्षकांचे मत आहे.
-------
कोरोनाच्या नियमांमुळे एकाच ठिकाणी बसावे लागत असून याची सवय नसल्याने सतत अवघडल्यासारखे आहे. पाय सतत मोकळे करावेसे वाटत आहे. पण, याचीही परत नक्की सवय होईल. पण, शाळा चालू झाल्यामुळे आम्ही विद्यार्थी आनंदी आहोत.
समृद्धी पाचकुडवे, विद्यार्थिनी
दोन वर्षे आम्ही विद्यार्थी एका वेगळ्याच तंत्रज्ञानाच्या युगात वावरत होतो. सुरुवातीला खूप चांगले वाटले, सर्व शिक्षक छोट्याशा मोबाईलमध्ये दिसत होते. परंतु नंतर आम्हाला या मोबाईलचा कंटाळा आला होता. पण, आता पुन्हा फळ्यावर शिकवलेले चांगले वाटत आहे. सवय नसल्यामुळे थोडा त्रास होत आहे. पण, आम्ही सवय करुन घेऊ.
मिहिर भाटवडेकर, विद्यार्थी
मोबाईलमधून शिकण्याचा मला कंटाळा आला होता. शाळा सुरू झाल्याने शिक्षकांना अनेक दिवसानंतर पाहता आले. तसेच सवय नसल्यामुळे अक्षरे अस्वच्छ येत आहेत. पण, शिक्षकही समजून घेत आम्हाला मार्गदर्शन करत आहेत.
मृणाल कांबळे, विद्यार्थिनी
शाळा सुरू झाल्यामुळे विद्यार्थी तर, प्रचंड खूश आहेत. ऑनलाईन शिक्षणामुळे मुलांचा अभ्यासाचा सराव थोडासा कमी झाला आहे. एका ठिकाणी बसण्याची विद्यार्थ्यांची सवय थोडीफार मोडली असल्या कारणाने ते तासातासाला वर्गात थोडेसे अस्वस्थ होतात. वर्गाच्या बाहेर जाण्यासाठी कारण शोधतात.
- दीप्ती इंगळे-सिद्धम, शिक्षिका
मुले आता मित्रांमध्ये मिसळत आहेत. यामुळे अनेक मुलांचे मोबाईलचे वेड कमी झाले आहे, असे काही पालकांचे मत आहे. शाळा सुरू झाल्यामुळे पालकांवरील अर्धा ताण कमी झाला आहे. तसेच मुलांच्या चेहऱ्यावर एक आत्मविश्वास दिसत आहे. विद्यार्थ्यांचा लिहिण्याचा वेग मात्र थोडा कमी झाला आहे.
- अंबादास पांढरे, प्राचार्य