सोलापूर : सरकारकडून अलीकडच्या काळात कंत्राटीकरण करण्याचा घाट घातला जात आहे. त्याला राज्य सरकारी कर्मचारी संघटनेचा विरोध राहील. जुनी पेन्शन योजना, पदोन्नती आणि रिक्त जागा भरती तातडीने सुरू करा, अन्यथा राज्यभर शासनाविरोधात लढा उभारावा लागेल, असा इशारा राज्य सरकारी कर्मचारी संघटनेचे नेते अविनाश दौंड यांनी दिला आहे .
सरकारी कर्मचारी संघटनेचा विभागीय मेळावा रामपूर दक्षिण सोलापूर येथे आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यात कर्मचाऱ्यांच्या प्रश्नावर चर्चा झाली. कोरोनाच्या काळात सरकारी कर्मचाऱ्यांनी केलेल्या कामाचे अविनाश दौंड यांनी कौतुक केले. मुख्यमंत्र्यांनी या कर्मचाऱ्यांची दखल घेऊन त्यांना न्याय द्यावा. त्यांच्या प्रश्नांसाठी मुख्यमंत्र्यांनी मध्यवर्ती संघटनेला चर्चेसाठी वेळ द्यावी, अशी मागणी दौंड यांनी यावेळी बोलताना केली. संघटनेचे जिल्हाध्यक्ष विरुपाक्ष घेरडे मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी होते.
संघटनेचे जिल्हा सरचिटणीस अमृत कोकाटे यांनी प्रास्तविक केले. संघटनेच्या कार्याची माहिती दिली. आरोग्य सेवेतील रिक्त पदे तातडीने भरण्याची मागणी बृहन्मुंबई कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष मिलिंद सरदेशमुख यांनी केली. यावेळी मारुती शिंदे ( पुणे), पी. एन. काळे (सांगली ) यांनी कर्मचाऱ्यांसमोरील अडचणी आणि त्यांच्या अपेक्षा यावर उपस्थितांना मार्गदर्शन केले. मेळाव्याला मुंबई जिल्हा कर्मचारी संघटनेचे कोषाध्यक्ष गणेश बकशेट्टी, नेताजी डिसले, सुनील बागुल यांच्यासह जिल्ह्यातील विविध शासकीय कार्यालयाचे कर्मचारी होते. जिल्हाध्यक्ष विरुपाक्ष घेरडे यांनी कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांना न्याय देण्यासाठी सहकार्याची अपेक्षा व्यक्त केली.
---------
प्रत्येक जिल्ह्यात होणार मेळावे
अंशदायी पेन्शन योजना रद्द करून जुनी पेन्शन योजना लागू करण्याबाबत शासन उदासीन आहे. हा प्रश्न कर्मचाऱ्यांच्या दृष्टीने संवेदनशील आहे. कर्मचारी संघटना त्याच्या अंमलबजावणीसाठी लवकरच राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात मिळावे घेईल. या मेळाव्याचा शुभारंभ सोलापूर जिल्ह्यातून होत असल्याचे गणेश देशमुख यांनी जाहीर केले.