उस्मानाबाद लोकसभेसाठी अर्ज भरण्यास आजपासून सुरुवात, तरीही उमेदवार निश्चित नाहीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 19, 2019 10:09 AM2019-03-19T10:09:02+5:302019-03-19T10:11:08+5:30
उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघासाठी आजपासून अर्ज दाखल करण्यास सुरुवात होणार आहे.
बार्शी : उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघासाठी आजपासून अर्ज दाखल करण्यास सुरुवात होणार आहे, तरीदेखील या मतदारसंघात महायुती व आघाडीमध्ये वाट्याला असलेल्या शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस या दोन्ही पक्षांनी आपले उमेदवार जाहीर न केल्याने निवडणुकीच्या आखाड्यात कोणत्या पक्षाचे कोणते उमेदवार असणार याबाबत उत्कंठा लागून राहिली आहे.
उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघात लातूर जिल्ह्यातील औसा-निलंगा, उस्मानाबाद जिल्ह्यातील उमरगा-लोहारा, उस्मानाबाद-कळंब, तुळजापूर, भूम-परांडा-वाशी व सोलापूर जिल्ह्यातील बार्शी या सहा विधानसभा मतदारसंघांचा समावेश आहे़ २००९ मध्ये राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते डॉ़ पद्मसिंह पाटील यांनी रवींद्र गायकवाड यांचा पराभव केला. त्यानंतर २०१४ च्या निवडणुकीत गायकवाड यांनी पराभवाचा बदला घेत विक्रमी मताधिक्याने विजयश्री मिळवली़ यंदाही शिवसेना विरुध्द राष्ट्रवादी अशी लढत होणार आहे. मात्र या दोन्ही पक्षाला अद्यापी उमेदवार निश्चित करण्यात यश आले नाही. शिवसेनेमध्ये विद्यमान खा. रवींद्र गायकवाड यांना उमेदवारी देण्याला जिल्ह्यातील सेना पदाधिकारी यांचा विरोध आहे़ त्यांनी उमेदवार बदलण्याची मागणी उध्दव ठाकरे यांच्याकडे केली आहे.
संपर्कप्रमुख तानाजी सावंत यांनीही आपली ताकद माजी आ़ ओमराजे निंबाळकर यांच्या पाठीशी उभी केली आहे़ याबरोबरच उस्मानाबादचे नगराध्यक्ष मकरंदराजे निंबाळकर, जिल्हाप्रमुख अनिल खोचरे ,माजी आ़ ज्ञानेश्वर पाटील यांची नावेही चर्चेत आहेत़ त्यामुळे शिवसेनेला उमेदवारी निश्चित करताना अडचणी येऊ लागल्या आहेत़ दुसरीकडे भाजपाने मतदारसंघात आमची ताकद वाढली असल्याचे सांगत मतदारसंघावर दावा सांगितला आहे़ त्यादृष्टीने भाजपा पदाधिकारी हालचाली करीत आहेत़ सेनाही उमेदवार निश्चित करेना़ भाजपाही मतदारसंघ मागत आहे त्यामुळे नेमके काय होणार अशी स्थिती निर्माण झाली आहे.
शिवसेना वि. राष्ट्रवादी की भाजप वि. काँग्रेस
च्राष्ट्रवादीकडून स्वत: राणाजगजितसिंह पाटील, त्यांच्या पत्नी अर्चनाताई पाटील व बार्शीचे आमदार दिलीप सोपल यांची नावे चर्चेत आहेत़ मात्र सोपल हे इच्छुक नसल्याचे वारंवार सांगत आहेत़ कालपासून औरंगाबाद व उस्मानाबाद या काँग्रेस व राष्ट्रवादीकडील मतदारसंघाची अदलाबदल होणार अशी चर्चा सोशल मीडियावर सुरु झाली आहे़ काँग्रेसकडून माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील-चाकूरकर, वैशालीताई विलासराव देशमुख यांची नावे चर्चेत आहे़त़ त्यामुळे या मतदारसंघात शिवसेना विरुध्द राष्ट्रवादी की भाजपा विरुध्द काँग्रेस अशी लढत होणार याबाबत उत्सुकता लागून राहिली आहे़
मी लोकसभा निवडणूक लढण्यासाठी इच्छुक नाही़ मात्र पक्षाचे अध्यक्ष शरद पवार, प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील, ज्येष्ठ नेते पद्मसिंह पाटील यांनी लढावे लागते असे सांगितले तर पक्षाचा निष्ठावान कार्यकर्ता म्हणून विचार केला जाईल़ परंतु त्यांनी अद्यापी तसे काही सांगितले नाही.
-दिलीप सोपल, आमदार