युक्रेनच्या सीमेवर युद्धाचा भडका; झळ साेलापुरातील घरांच्या बांधकामाला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 2, 2022 04:28 PM2022-03-02T16:28:51+5:302022-03-02T16:28:57+5:30
स्टीलचे दर वाढले - बांधकामाचा खर्च १५०० रुपयांवरून २५०० स्क्वेअर फूट झाल्याचा दावा
साेलापूर -रशिया आणि युक्रेनमधील युद्धाचे परिणाम शहर आणि जिल्ह्याच्या बाजारपेठेवर झाले आहेत. युद्धामुळे स्टील, सिमेेंट महागले असून घरांच्या बांधकामाचा खर्च १५०० रुपये प्रतिस्क्वेअर फुटावरून २५०० रुपयांवर गेल्याचे व्यापारी व बिल्डर्स सांगत आहेत. घरांचे बांधकाम काढून बसलेले लाेक मेटाकुटीला आले आहेत.
काेराेनाची दुसरी लाट ओसरल्यानंतर बांधकाम व्यवसायात तेजी आली हाेती. छाेट्या घरांपासून टाेलजंग अपार्टमेट्सच्या बांधकामांना गती आली. रशिया आणि युक्रेनमध्ये युध्द सुरू झाल्यानंतर स्टील, सिमेंट, क्रूड ऑईलचे भाव वाढले आहेत. बाजारपेठेतील उलाढाल एकदम कमी झाल्याचे व्यापारी सांगत आहेत. शासकीय ठेकेदार अडचणीत आले आहेत. या सर्वांनी कामाच्या दरवाढीचा सूर आळवायला सुरुवात केली.
--
कशामुळे झाली वाढ
स्टीलसाठी मॅगनीज हा कच्चा माल लागताे. हा माल युक्रेनमधून आयात हाेताे. स्टीलचा दर दहा दिवसांपूर्वी प्रति किलाे ५८ ते ६० रुपये हाेता. आता ताे ७० रुपये झाला. सिमेंटचा दर २० टक्क्यांनी वाढला. क्रूड ऑईलचे दर वाढल्याने बांधकामांना लागणाऱ्या इतर साहित्याच्या दरात २५ ते २० टक्क्यांनी वाढ झाली आहे.
--
शहरातील दाेन बिल्डर्स मार्च महिन्यात नव्या अपार्टमेंट्सचे काम सुरू करणार हाेते. या दाेघांनी १५ दिवसानंतर काम सुरू करण्याचा निर्णय घेतला. दरवाढीमुळे बांधकाम साहित्य खरेदीसाठी येणाऱ्या सर्वसामान्य ग्राहकांची संख्या या आठवड्यात कमी झाली. यापूर्वी जे साहित्य घेऊन गेले त्यांच्याकडूनही येणे थांबले. युध्दाची झळ निश्चितच आम्हाला बसली आहे.
- सुनील ताेष्णीवाल, श्रीनाथ स्टील्स.
--
युध्द न थांबल्यास स्टील, सिमेंट व इतर वस्तूंच्या दरात माेठी वाढ हाेईल. सामान्य माणसाला हे दर परवडणार नाहीत. त्यामुळे बाजारातील उलाढाल थांबू शकते. सामान्य माणूस बऱ्याचदा घराचे काम करताना थांबत नाहीत. यातून त्याच्यावरचा बाेजाही वाढू शकताे.
- गिरीश जाखाेटिया, कृष्णा स्टील्स.
--