थकीत एफआरपीचे २२ कोटी शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 5, 2021 06:48 AM2021-02-05T06:48:49+5:302021-02-05T06:48:49+5:30
खर्डी (ता. पंढरपूर) येथील सीताराम शुगर्स या खाजगी साखर कारखान्यास २०१८-१९ या गाळप हंगामात ऊसपुरवठा केलेल्या शेतकऱ्यांची प्रतिटन २२३१ ...
खर्डी (ता. पंढरपूर) येथील सीताराम शुगर्स या खाजगी साखर कारखान्यास २०१८-१९ या गाळप हंगामात ऊसपुरवठा केलेल्या शेतकऱ्यांची प्रतिटन २२३१ रुपयांनुसार एफआरपीची २३ कोटी ५० लाख रुपयांपेक्षा अधिक रक्कम थकीत होती. ही रक्कम मिळावी म्हणून शेतकऱ्यांनी संघर्ष केला होता.
प्रशासनाने कारखान्याची उत्पादित साखर ताब्यात घेऊन तिची विक्री करून रक्कम उभा केली. मात्र, गेल्या काही महिन्यांत साखरेचा भाव शासकीय हमी भावाच्या तुलनेत कमी झाल्याने व्यापारी साखर खरेदी करण्यास पुढे आले नाहीत. मात्र, साखरेचे दर वाढल्यानंतर प्रशासनाने साखर विक्री करून पहिल्या टप्प्यात २ हजार रुपये प्रतिटन याप्रमाणे रक्कम शेतकऱ्यांना दिली आहे. एफआरपीची उर्वरित २३१ रुपयांनुसार सुमारे दीड कोटी रुपयांची रक्कम लवकरच शेतकऱ्यांना देण्यात येईल, असेही प्रांताधिकारी सचिन ढोले यांनी सांगितले.
पैसे मिळाल्याने शेतकऱ्यांना आधार
सीताराम साखर कारखान्याकडे ऊस बिलाची रक्कम अडकल्याने सर्वसामान्य शेतकरी आर्थिक अडचणीत होता. मागील वर्षीचा दुष्काळ, कोरोना महामारी, अतिवृष्टीमुळे शेतकरी सध्या अधिकच अडचणीत येत असताना महसूल व कारखाना प्रशासनाने योग्य समन्वय साधत उशिरा का होईना सर्व रक्कम शेतकऱ्यांना देण्यासाठी मोठी भूमिका बजावली.
----
सीताराम साखर कारखान्याकडे ऊस उत्पादकांची एफआरपीची रक्कम थकीत होती. ती रक्कम मिळावी म्हणून शेतकरी आणि संघटनांनी आंदोलने केली, तो त्यांचा अधिकार होता. साखर कारखाना प्रशासनानेही यासंदर्भात सहकार्य केले. त्यामुळे सुमारे २२ कोटी रुपयांची थकीत रक्कम शेतकऱ्यांना देण्यात यश आले आहे.
- सचिन ढोले, प्रांताधिकारी