नांदणीचा चेक पोस्ट चुकवून जाताहेत ओव्हरलोडेड वाहने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 3, 2021 04:16 AM2021-06-03T04:16:34+5:302021-06-03T04:16:34+5:30

दक्षिण सोलापूर : महाराष्ट्रातून कर्नाटकात जाणारी ओव्हरलोडेड वाहने नांदणीच्या चेक पोस्ट चुकवण्यासाठी बरूरमार्गे टाकळीला जात असल्याने शासनाला दररोज लाखो ...

Overloaded vehicles miss Nandani's check post | नांदणीचा चेक पोस्ट चुकवून जाताहेत ओव्हरलोडेड वाहने

नांदणीचा चेक पोस्ट चुकवून जाताहेत ओव्हरलोडेड वाहने

Next

दक्षिण सोलापूर : महाराष्ट्रातून कर्नाटकात जाणारी ओव्हरलोडेड वाहने नांदणीच्या चेक पोस्ट चुकवण्यासाठी बरूरमार्गे टाकळीला जात असल्याने शासनाला दररोज लाखो रुपयांच्या महसुलावर पाणी सोडावे लागत आहे. परिवहन विभाग आणि खासगी वाहतूकदार यांच्यातील संगनमताने हा प्रकार बिनबोभाट सुरू असल्याचा आरोप नांदणीच्या ग्रामस्थांनी केला आहे.

महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवर टाकळी ते नांदणीदरम्यान केंद्र सरकारने चेक पोस्टची स्थापना केली आहे. महाराष्ट्र आणि दक्षिण भारतात ये-जा करणाऱ्या जड वाहनांची तपासणी केली जाते. वाहनांची नोंदणीकृत कागदपत्रे तसेच वाहतूक परवान्याच्या मर्यादेत मालाचे वजन आहे की वाहन ओव्हरलोडेड आहे, याची पडताळणी करण्यात येते. क्षमतेपेक्षा अधिक वजन असल्यास दंडात्मक कारवाई करण्यात येते.

दंडात्मक कारवाई टाळण्यासाठी क्षमतेपेक्षा अधिक वजनाची वाहतूक करणाऱ्या काही वाहनांनी अलीकडच्या काळात चेक पोस्ट चुकवून जाण्यासाठी नवा मार्ग शोधला आहे. ही वाहने सोलापूरहून विजयपूरकडे जाताना थेट नांदणीच्या चेक पोस्टकडे जाण्याऐवजी राष्ट्रीय महामार्गावरून नांदणी गावात शिरतात. एकेरी रस्त्याने बरूरला जातात. तेथून वळसा घेऊन टाकळीच्या शिवाजी चौकात पुन्हा महामार्गाला येऊन मिळतात. आठ किलोमीटर जास्त वाहतूक करताना त्यांना तपासणीची कटकट टाळता येते, दंडाच्या रकमेतून सुटका होते.

नांदणी गावाच्या मध्यातून हा चोरून जाणारा रस्ता असल्याने ग्रामस्थांना त्याचा त्रास सोसावा लागत आहे. वाहनांच्या रांगा लागत आहेत. अवजड वाहने सुसाट वेगाने धावताना स्थानिकांना जीव मुठीत घेऊन गावातून वावरावे लागते. महिला, लहान मुले यांना या वाहतुकीचा खूपच त्रास होतो. ग्रामस्थांनी वारंवार या चोरट्या वाहतुकीवर कारवाई करण्याची मागणी परिवहन विभागाकडे केली आहे, मात्र त्यांच्या मागणीची आणि तक्रारींची दखल घेतली जात नाही, अशी खंत नागरिकांनी व्यक्त केली.

---------

लाखोंचे व्यवहार करणारी टोळी सामील

चेक पोस्ट चुकवून क्षमतेपेक्षा अधिक वजनाची वाहतूक करणाऱ्या वाहनांकडून रकमा उकळणारी मोठी टोळी या परिसरात अनेक वर्षांपासून कार्यरत आहे. ओव्हरलोडेड वाहनधारकांकडून मोठ्या रकमा घेऊन ही टोळी त्यांना नांदणी - बरूर - टाकळी या प्रवासासाठी मदत करीत असल्याने अनेकदा वादाचे प्रसंग उद्‌भवल्याची चर्चा आहे.

---------

रस्त्यांची दुर्दशा अन्‌ महसुलात घट

नांदणीच्या ग्रामस्थांनी चेक पोस्ट चुकवण्यासाठी गावातून अवजड वाहतूक करणाऱ्या वाहनांना नेहमीच विरोध केला आहे. परिवहन विभागाच्या अधिकाऱ्यांच्या निदर्शनास ही बाब आणून दिली. वाहतूक रोखण्याची मागणी करूनही विभागाने त्याकडे डोळेझाक केल्याने रस्त्यांची दुरवस्था होत आहे. रस्त्यांवर मोठे खड्डे पडत आहेत, शिवाय शासनाला अशा वाहतुकीमुळे लाखो रुपयांच्या महसुलावर पाणी सोडावे लागत आहे.

---------

गावातून अवजड वाहतूक करणाऱ्या वाहनांमुळे ग्रामस्थांना जीव मुठीत धरून चालावे लागते. कधी कधी तर महामार्गावर कमी वाहने आणि चोरट्या मार्गाने जाणाऱ्या वाहनांची गर्दी अधिक असते. तक्रार कोणाकडे करावी, असा प्रश्न आमच्यासमोर आहे.

- नागण्णा बनसोडे

ज्येष्ठ नागरिक, नांदणी

---------

फोटो - ३१ चेकपोस्ट

चेक पोस्ट चुकवण्यासाठी क्षमतेपेक्षा अधिक वजनाची वाहतूक करणारी वाहने अशी रांगेने नांदणीच्या रस्त्यावरून पुन्हा टाकळीजवळ महामार्गाला येऊन मिळतात.

Web Title: Overloaded vehicles miss Nandani's check post

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.