पंढरपुरातील संचारबंदीचा चेंडू पुन्हा जिल्हाधिकाऱ्यांच्या कोर्टात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 10, 2021 04:16 AM2021-07-10T04:16:03+5:302021-07-10T04:16:03+5:30
पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी आषाढी वारीच्या नियोजनाबाबत सर्व अधिकाऱ्यांची बैठक घेतली. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष अनिरुद्ध कांबळे, आ. प्रशांत ...
पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी आषाढी वारीच्या नियोजनाबाबत सर्व अधिकाऱ्यांची बैठक घेतली. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष अनिरुद्ध कांबळे, आ. प्रशांत परिचारक, आ. समाधान आवताडे, नगराध्यक्षा साधना भोसले, पंढरपूर मंदिर समितीचे सदस्य ह.भ.प. ज्ञानेश्वर महाराज जळगांवकर, जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, जिल्हा पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अर्जुन गुंडे, प्रांताधिकारी सचिन ढोले, कार्यकारी अधिकारी विठ्ठल जोशी, उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम कदम, विठ्ठलचे अध्यक्ष भगीरथ भालके, तहसीलदार सुशील बेल्हेकर, राज्य उत्पादन शुल्कचे रवींद्र आवळे, जिल्हा शल्यचिकित्सक प्रदीप ढेले, गटविकास अधिकारी रविकिरण घोडके, मुख्याधिकारी अरविंद माळी आदी उपस्थित होते.
या बैठकीत कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक आरोग्य विभाग, नगरपालिका प्रशासन, जिल्हा परिषद आरोग्य विभाग यांनी आपसात समन्वय ठेवून लसीकरण, स्वच्छता, आरोग्य तपासणी, शुद्ध पाण्याचा पुरवठा, आवश्यक ठिकाणी तात्पुरती स्वच्छतागृहे, वाखरी पालखीतळ स्वच्छता याकडे प्राधान्याने लक्ष द्यावे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने दिलेले निर्देश आणि परंपरा यांचा समन्वय साधून आषाढी वारीचे नेटकेपणाने नियोजन करा. यासाठी सर्व विभागांनी आपली जबाबदारी चोखपणे पार पाडावी, अशा सूचना पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिल्या.
लाखो नागरिकांना वेठीस धरण्याचे काम : परिचारक
आषाढी यात्रेसाठी फक्त ४०० च्या आसपास भाविक येणार आहेत. परंतु त्यांच्यासाठी लाखो नागरिकांना वेठीस धरण्याचे काम सरकारकडून होत आहे. त्यामुळे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे संचारबंदी फक्त तीन दिवस करावी, अशी मागणी केली होती. परंतु पालकमंत्र्यांनी याबाबत काहीच निर्णय घेतला नाही. यावरून सरकारची संचारबंदी उठविण्याबाबत मानसिकता नसल्याचे दिसून येत आहे. या बैठकीत जिल्हाधिकाऱ्यांनीच मार्ग काढावा, अशी सूचना या बैठकीत दिली आहे. यामुळे संचारबंदीच्या निर्णयाचा चेंडू शासनाच्या कोर्टात असल्याचे आ. प्रशांत परिचारक यांनी सांगितले.
धनगर समाजाची समजूत काढू
धनगर समाजाच्या आरक्षणासंदर्भात निर्णय घ्यावा अन् मुख्यमंत्र्यांनी विठ्ठलाच्या महापूजेसाठी यावे. अन्यथा त्यांना विरोध केला जाईल, असा इशारा धनगर समाजातील प्रमुख नेत्यांनी दिला होता. परंतु त्यांची आम्ही समजूत काढून शासकीय महापूजा योग्यरित्या पूर्ण करू, असे पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी सांगितले.
फोटो ::::::::::::::::::::::
आषाढीसंदर्भात अधिकाऱ्यांना सूचना देताना पालकमंत्री दत्तात्रय भरणे. यावेळी आ. प्रशांत परिचारक, आ. समाधान आवताडे, जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर व अन्य.