पंढरपूर : श्री विठ्ठल रखुमाईच्या चरणी भक्ताकडून पावणे दोन कोटी रुपयांचे सोन्याचे दागिने अर्पण
By Appasaheb.patil | Published: January 26, 2023 09:09 AM2023-01-26T09:09:40+5:302023-01-26T09:10:09+5:30
पंढरपूरच्या पांडुरंगाला एका भाविकाने पावणे दोन कोटी रुपयांचे दागिने अर्पण केले आहेत.
पंढरपूर : पंढरपूरच्या पांडुरंगाला एका भाविकाने पावणे दोन कोटी रुपयांचे दागिने अर्पण केले आहेत. विठ्ठल आणि रुक्मिणीचा विवाह सोहळा गुरुवारी होत आहे. या विवाह सोहळ्याच्या निमित्ताने जालन्याचा एका भाविकाने सुमारे दोन कोटी रूपयांच्या सोन्याचे दोन मुकुट, सोन्याच्या बांगड्या असे दागिने विठुरायाच्या चरणी अर्पण केले.
याचबरोबरच विवाह सोहळ्याच्या निमित्ताने सोन्या-चांदीचे रुखवत देखील भेट देण्यात आले आहेत. या भाविकाने आज विठुरायासाठी रेशमी वस्त्राचा पोशाख देखील भेट दिला आहे. हे सर्व दागिने बुधवारी मंदिर समितीकडे सुपूर्द करण्यात आले.
जालन्याच्या भाविकांने दिले गुप्तदान
जालना येथील एका भाविकांनी हे गुप्त दान विठुरायाच्या चरणी अर्पण केले आहे. गेल्या पन्नास वर्षातील सर्वात मोठे विठुरायाच्या चरणी दान अर्पण झाले आहे.
देवाचरणी या वस्तू
या गुप्त दानामध्ये श्री विठ्ठल रुक्मिणी यांना सोन्याचे मुकुट, विठ्ठल रुक्मिणी मातेला मोहोन माळ, रुक्मिणी मातेला कोल्हापुरी साज, पाटल्या, बांगड्या, मंगळसूत्र, जोडवी असे सोन्याचे दागिने दिले. देवाच्या नित्योपचारासाठी चांदीचे मोठे ताट, वाटी, समई, तांब्याची भांडी, ताम्हण, पळी, मोठा देवाचा चांदीचा आरसा अशा किमती वस्तू अर्पण केल्या असल्याची माहिती मंदिर समितीचे व्यवस्थापक बालाजी पुदलवाड यांनी दिली आहे.