अंगावर का थुंकलास म्हणत प्रवासी, चालकाला मारहाण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 3, 2021 04:19 AM2021-04-03T04:19:37+5:302021-04-03T04:19:37+5:30
मोहोळ : कोल्हापूरहून सोलापूरकडे निघालेल्या एस. टी. बसला दुचाकी आडवी लावून अंगावर का थुंकलास म्हणत एका प्रवाशाला पोखरापूर येथील ...
मोहोळ : कोल्हापूरहून सोलापूरकडे निघालेल्या एस. टी. बसला दुचाकी आडवी लावून अंगावर का थुंकलास म्हणत एका प्रवाशाला पोखरापूर येथील काही तरुणांनी मारहाण केली. दरम्यान, मध्यस्थी करणाऱ्या एस. टी. चालकालाही मारहाण करत खाली ओढून त्याच्याकडील मोबाईल या तरुणांनी काढून घेतला. याप्रकरणी चार अनोळखी तरुणांविरोधात मोहोळ पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही मारहाणीची घटना २ एप्रिल रोजी दुपारी ४ वाजताच्या दरम्यान घडली.
कोल्हापूरहून सोलापूरला एस. टी. बस (एमएच ४० वाय ५०३७) ही मोहोळमार्गे निघाली होती. दरम्यान, ही बस पोखरापूर येथे आली असता, बसमधील महिला प्रवासी दीपाली अंकुश बत्ते (रा. इचलकरंजी) यांनी लहान मुलाला जवळील असलेले पाणी पाजले व राहिलेले थोडे पाणी खिडकीतून बाहेर टाकले. ते पाणी पोखरापूरहून मोहोळकडे येणाऱ्या दुचाकीस्वाराच्या अंगावर पडले. या दुचाकीस्वाराने पाठलाग करत आपली दुचाकी एस. टी.ला आडवी लावत त्या महिलेच्या पतीला तू आमच्या अंगावर का थुंकलास म्हणत शिवीगाळ करत मारहाण चालू केली. यावेळी त्याच्या पत्नीने मध्यस्थी करत आमच्या पतीकडून चुकले आहे, आम्हाला मारहाण करू नका, अशी विनवणी केली. त्यानंतर या तरुणांनी पाठीमागून आणखी दोघांना बोलावून घेतले. तरुणांनी रंगपंचमी खेळली असल्यामुळे चेहऱ्यावर मोठ्या प्रमाणात रंग लावला होता. या बसचे चालक उमाकांत पोपट कवडे यांनी या तरुणांना समजावून सांगत भांडण मिटवण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यातील एकजण चालकाच्या बाजूकडून एस. टी.मध्ये चढून उमाकांत कवडे यांचा गच्चीला पकडून त्यांना खाली ओढून चौघांनी मिळून मारहाण केली. शिवाय त्यांच्या खिशातील १३ हजार रुपये किमतीचा मोबाईल जबरदस्तीने घेऊन निघून गेले, अशा आशयाची फिर्याद उमाकांत कवडे यांनी पोलीस ठाण्यात दिली. याप्रकरणी चार अनोळखी तरुणांविरोधात गुन्हा दाखल केला असून, अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक संतोष माने करत आहेत.