सोलापूर : सोलापुरातून पतंजलीच्या माध्यमातून टेक्सटाईल उद्योग सुरू करण्याचे संकेत योगगुरू रामदेव बाबा यांनी दिले आहेत. पतंजली टेक्सटाईल ब्रँडचे टॉवेल आणि बेडशीट येथून तयार करण्याचे सूचक वक्तव्य त्यांनी शुक्रवारी येथे केले.
पतंजली योग समिती आणि भारत स्वाभिमान ट्रस्टच्या वतीने १७ मार्चपासून अक्कलकोट येथे तीन दिवसीय योग चिकित्सा ध्यान साधना शिबिर होत आहे. त्यासाठी सोलापुरात आगमन झाले असता पत्रकार परिषदेत ते बोलत होते. सहकार मंत्री सुभाष देशमुख, अक्कलकोट येथील शिबिराचे आयोजक सचिन कल्याणशेट्टी यावेळी प्रामुख्याने उपस्थित होते.
टेक्सटाईल उद्योगासंदर्भात बोलताना ते म्हणाले, पतंजली टेक्सटाईलच्या माध्यमातून तीन हजार प्रकारच्या वेगवेगळ्या प्रकारचे वस्त्र तयार केले जातात. सोलापुरात फॅक्टरी उघडण्याचे पतंजलीचे नियोजन नाही. मात्र येथील टेक्सटाईल उद्योगाला असलेली मोठी संधी आणि त्यावर अवलंबून असलेल्या कामगारांचा विचार करता येथून पतंजली टेक्सटाईल ब्रँ्रडचे टॉवेल आणि बेडशीटच्या उत्पादनाची आपली तयारी आहे. त्यानंतर टप्प्याटप्प्याने अन्य कापडाच्या उत्पादनाचा विचार केला जाईल, असेही ते म्हणाले.
या तीन दिवसांच्या शिबिरादरम्यान १८ मार्चला आपण सोलापुरातील टेक्सटाईल आणि गारमेंंट उद्योजकांशी संवाद साधणार असून, त्यांच्याकडून माहिती जाणून घेणार असल्याचेही रामदेवबाबा यांनी यावेळी सांगितले. वस्त्रोद्यागमंत्री सुभाष देशमुख यांनी यासंदर्भात आपणास सुचविले होते. पतंजली टेक्सटाईलच्या उद्योगाचा लाभ सोलापूरलाही व्हावा, अशी त्यांची इच्छा होती. त्यानुसार आपण या दृष्टीने तयारी दर्शविल्याची माहिती त्यांनी दिली.
काळा पैसा आणण्याचे आणि देश भ्रष्टाचारमुक्त करण्याचे आपले स्वप्न होते. काळा पैसा परत यावा, यासाठी आपली असलेली भूमिका आजही कायम आहे. डिजिटलायजेशनचे तत्र वापरून पंतप्रधान मोदींनी भ्रष्टाचारावर काही प्रमाणार नियंत्रण आणले आहे. या तंत्राचा वापर आणि राजकीय इच्छाशक्तीतूनच यावर आळा घालता येईल, असे ते म्हणाले. आपण भविष्यात कुठल्याही राजकीय पक्षात जाणार नाही. अथवा कोणतेही राजकीय पद स्वीकारणार नाही. अशी प्रतिज्ञा यापूर्वीच घेतली आहे. त्यावर आपण ठाम असल्याचे ते म्हणाले. रामनवमीच्या मुहूर्तावर ८८ सन्याशांना प्रथमच दीक्षा देणार येत्या रामनवमीला आपण प्रथमच ८८ अनुयायांना सन्याशी म्हणून दीक्षा देणार असल्याची माहिती रामदेवबाबा यांनी दिली. ते म्हणाले, भारतात मोठे परिवर्तन आपणास आणायचे आहे. आध्यात्माच्या माध्यमातून जातीधर्माच्या भिंती तोडण्याचे काम आपण सुरु केले आहे. आपल्यानंतरही हे कार्य भारतात सुरू राहावे यासाठी आयुष्यात प्रथमच आपण ८८ अनुयायांना दीक्षा देणार आहोत. एक हजारांवर आचार्य पदाचे सन्याशी तयार करण्याचे आपले स्वप्न आहे.
हा देश योगमय आणि निरोगी करण्याचे आपले स्वप्न आहे. योगाला आपण अभ्यास मानत नाही. यापूर्वी ग्रंथात आणि गुफेत बंदीस्त असलेला योग आपण सर्वसामान्य माणसापर्यंत पोहचविला. हरिद्वारला वेदावर आधारित अध्ययन केंद्र सुरु केले. यापूर्वी केवळ एकाच समाजासाठी असलेले वेद सकल समाजासाठी खुले केले. स्त्रियांसाठीही वेद शिक्षण खुले केले. योगाने दुर्धर आजार दूर होतात, हे आपण सप्रयोग सिद्ध केले आहे. आपल्याकडे ३०० शास्त्रज्ञ असल्याचा दावाही त्यांनी केला.