यंत्रमागधारकांना किमान वेतन द्या, नाही तर कारवाईस सामोरे जा : जिल्हाधिकारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 7, 2019 05:16 PM2019-03-07T17:16:10+5:302019-03-07T17:16:52+5:30
सोलापूर : यंत्रमाग कामगारांच्या किमान वेतनप्रश्नी पुन्हा जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेण्यात आली. या बैठकीत जिल्हाधिकाºयांनी किमान वेतन मिळत नसेल ...
सोलापूर : यंत्रमाग कामगारांच्या किमान वेतनप्रश्नी पुन्हा जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेण्यात आली. या बैठकीत जिल्हाधिकाºयांनी किमान वेतन मिळत नसेल तर प्रत्येक कारखान्याची पडताळणी करण्यात येईल, किमान वेतन न देणाºया कारखानदारांवर कारवाई करण्यात येईल, असा इशारा बैठकीत दिला.
सोलापुरातील यंत्रमाग कामगारांना हंगामी मजुरीत ५० टक्के वाढ करण्यात यावी, ही मागणी घेऊन सिटूमार्फत गेल्या दीड वर्षांपासून शासन आणि प्रशासकीय पातळीवर संघर्ष चालू आहे. याविषयी लाल बावटा संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर वारंवार आंदोलन करण्यात आले. जिल्हाधिकाºयांनी दखल घेऊन एक बैठक घेतली. या बैठकीत १०० कार्डास १० ऐवजी १५ पैसे देण्याची सूचना केली, परंतु कारखानदारांशी चर्चा करून भूमिका कळवू, अशी भूमिका यंत्रमागधारक संघाने घेतली. यानंतर बुधवारी पुन्हा बैठक घेण्यात आली. या बैठकीत यंत्रमागधारकांनी एकही रुपया वाढवता येणार नाही, अशी भूमिका घेतली.
जिल्हाधिकाºयांनी यावर नियमानुसार किमान वेतन द्यावे लागेल, असे सांगितले. १२,४४९ एवढे किमान वेतन शासनाने ठरविलेले आहे. तेवढे वेतन कामगारांना मिळते की नाही, याबाबतची पडताळणी करणार असल्याचे सांगितले. पडताळणीत किमानपेक्षा कमी वेतन देणारे कारखानदार आढळून आल्यास त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल, असा इशारा या बैठकीत दिला. यानंतर त्यांनी लगेचच सहायक कामगार आयुक्तांंना प्रत्येक कारखान्याची चौकशी करण्याचे आदेश दिले.
या बैठकीस लाल बावटा संघटनेच्या वतीने भूमिका मांडताना नरसय्या आडम म्हणाले, जिल्हाधिकाºयांनी बैठकीतील लवादाच्या निर्णयाप्रमाणे १५ पैशांपेक्षा एक नया पैसा कमी आम्ही मान्य करणार नाही, कामगार कायद्यानुसार किमान वेतनाची अंमलबजावणी करा. नाहीतर प्रत्येक कामगारामार्फत सहा. कामगार आयुक्तांकडे दावा दाखल करण्यात येईल.
आजपर्यंत सहानुभूतीपूर्वक कामगार आपल्या पाठीशी उभा राहिला, परंतु आताही त्यांना फसवणार असाल तर यंत्रमाग उद्योगाला शासनाच्या सवलती मिळतात, त्या थांबविण्याची मागणी मुख्यमंत्र्यांकडे करणार असल्याचे आडम यांनी सांगितले.
ईपीएफनंतर किमान वेतन...
- २ आॅगस्ट २०१७ रोजी भविष्य निर्वाह निधी कार्यालयाचे विभागीय आयुक्त डॉ. हेमंत तिरपुडे यांनी अक्कलकोट रोड एमआयडीसी येथील हिमालय टेक्स्टाईल या कारखान्यासह सर्व यंत्रमाग कारखानदारांनी कामगारांना ‘ईपीएफ’ लागू करण्याचे आदेश दिले होते. त्यावेळी कारखानदारांनी याला जोरदार विरोध करून कारखाने बेमुदत बंद ठेवले होते. आता जिल्हाधिकाºयांनी किमान वेतनाच्या मुद्यावर कारखानदारांची तपासणी करून कारवाईचे आदेश दिले असल्यामुळे पुन्हा यंत्रमागधारक, कामगार आणि प्रशासन यांच्यात संघर्ष अटळ आहे.
आज सभा
- गुरुवारी सायंकाळी पाच वाजता यंत्रमागधारक संघ कार्यालयासमोर जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले आहे. या सभेत सर्व यंत्रमाग कामगारांना विश्वासात घेऊन बैठकीचा इतिवृत्तांत सांगण्यात येईल व पुढील आंदोलनाची दिशा व कार्यक्रमाची आखणी करण्यात येईल, असे आडम यांनी सांगितले.