अरुण बारसकर
सोलापूर : अद्ययावत शेतीतून चांगले उत्पादन घेण्यासाठी मल्चिंग व ठिबकच्या सहाय्याने ढोबळी मिरची व खरबुजाचे पीक घेतले. मिरचीला दर मिळाला नाही व खरबूज कोरोनामुळे जागेवरच सडले. ही व्यथा आहे रानमसले येथील वसंत रामा पाटील यांची.
उत्तर सोलापूर तालुक्यातील रानमसले गावालगत वसंत पाटील यांची चार एकर शेती. पत्नी, दोन मुले व सुना शेतातच राबतात. मुलगा सचिन व संतोष यांनी एक एकर ढोबळी सिमला मिरची केली. त्यासाठी रान तयार केले, त्यावर मल्चिंग कागद टाकला. नव्याने ठिबक केले व मिरची लावली. चांगली मिरची येण्यासाठी ठिबक सिंचनाद्वारे खते दिली. शिवाय आवश्यक तेवढ्या फवारण्याही केल्या.
मिरचीचे पीक जोमात आणले. आता चांगला पैसा होईल असे वाटत असतानाच मिरचीला दरच मिळाला नाही. तोडणीचा खर्चही मिरचीच्या विक्रीतून होत नसल्याने तोडणीच बंद केली. मिरचीसाठी मल्चिंग, ठिबक, खते व रोपांसाठी साधारण तीन लाख रुपये खर्च झाल्याचे सचिन पाटील यांनी सांगितले.
अशीच स्थिती खरबुजाचीही झाली. रान तयार करुन मल्चिंग व ठिबकसाठी खर्च करुन पावणेदोन एकरात ११ हजार खरबुजाची रोपे लावली. आवश्यक खते, फवारण्या केल्याने दर्जेदार खरबूज आले. अशी विक्री सुरू होणार इतक्यात कोरोनामुळे संचारबंदी लागू झाली. बाजारात विक्रीसाठी घेऊन जाता येईना व सभोवतालच्या गावात विक्रीसाठी गेल्यावर गावकºयांकडून वाहनाची अडवणूक झाली. पोलीसही वाहने अडवू लागले. त्यामुळे खरबूज जागेवरच सडले. खरबूज पीक घेण्यासाठी दोन-अडीच लाख रुपये खर्च झाला; मात्र थोड्याफार विक्रीतून ५० हजार रुपये मिळाल्याचे सचिन पाटील यांनी सांगितले.
खर्चही निघाला नाही- सलग तीन वर्षे वेगवेगळ्या पिकांसाठी आठ ते दहा लाख रुपये खर्च केला; मात्र केलेला खर्चही उत्पादन विक्रीतून निघाला नाही. एकतर पाण्याची अडचण त्यातून तुटपुंज्या पाण्यावर आणलेल्या मालाला भाव मिळत नाही. त्यामुळे अडचणीत आलो, असल्याची व्यथा रानमसलेचे शेतकरी वसंत पाटील यांनी व्यक्त केली.
मोजक्या शेतकºयांना शेती उत्पादनातून चांगला पैसा मिळतो; मात्र बहुतांश शेतकरी खर्च करूनही अपेक्षित उत्पादन न आल्याने व मालाला अपेक्षित भाव मिळत नाही. यावर्षी तर कोरोनामुळे संपूर्ण शेती नुकसानीत आहे.- प्रभाकर देशमुख, जनहित शेतकरी संघटना