बाप रे...; मुंबईतल्या गवंडी, सुतार, दागिने कारागिरांची सोलापुरातून पायपीट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 11, 2020 03:31 PM2020-05-11T15:31:50+5:302020-05-11T15:35:02+5:30
विजयपूर, आलमट्टीला पोहोचण्यासाठी संघर्ष; अनेक वाहनांना हात केला, मात्र कुणी थांबले नाही
सोलापूर : शहरातून जाणारा विजयपूर रोड हा कर्नाटकाला जाऊन मिळतो. नेहमीच गाड्यांची वर्दळ असणाºया या रोडवर आता मोजकी काही वाहने तर पायपीट करणारे मजूर जाताना दिसत आहेत़ मुंबई-पुणे येथून सोलापुरात आल्यानंतर पुन्हा पायी जात आपले घर गाठण्यासाठी संघर्ष करत आहेत. यात सुतारकाम, गवंडीकाम तसेच दागिने कारागिरांचा समावेश आहे.
सध्या विजयपूर रोडवरुन अनेक मजूर चालत जाताना पाहायला मिळत आहेत़ यातील बहुतांश मजूर हे कर्नाटकातील असून, मुंबई व पुणे येथे काम करत होते. लॉकडाऊनमुळे काम बंद असल्याने घराचे भाडे व खाण्याचा खर्च भागवू शकत नसल्याने त्यांच्यावर पायपीट करण्याची वेळ आली आहे. काही मजूर हे मुंबई-पुणे, पुणे -सोलापूर असा प्रवास मिळेल त्या वाहनांनी केला. बहुतांश गाड्या या कोरोनाच्या भीतीमुळे थांबत नाहीत. मग, पुन्हा पायपीट सुरुच करावी लागते. तर काही वाहने ही चेकपोस्टच्या अलीकडे थांबत मजुरांना इथून पुढे चालत जाण्याचा सल्ला देत आहेत.
सोलापुरात आल्यानंतर पुन्हा पायपीट करावी लागत आहे. अनेक वाहनांना हात केला, मात्र कुणी थांबले नाही.
विजयपूर येथे जाणाºया एका कुटुंबामधील लहानग्यांच्या पायात चप्पलही नव्हती. तर आलमट्टी येथे पायी जाणाºया कुटुंबीयांचे जेवण संपले होते. वडकबाळ येथे जाऊन गावकºयांकडून जेवण मागून खाणार असल्याचे त्यांनी सांगितले.
मुंबई ते सोलापूर प्रत्येक व्यक्ती दोन हजार रुपये
- लॉकडाऊनमुळे खासगी वाहनांना प्रवास करण्यास बंदी घालण्यात आली आहे. तर काही मोजक्या वाहनांना शासनाने परवानगी दिली आहे. जे मजूर चालत येतात ते या वाहनांना थांबण्याची विनंती करतात. मुंबईवरुन जाणारी ही वाहने थांबल्यानंतर पुणे किंवा सोलापुरात येतात. मुंबईवरुन सोलापुरात यायला प्रत्येकाला सुमारे दोन हजार रुपये घेतले जात आहे. रेल्वेने कमी तिकिटात जाण्याची वेळ आता नसल्याने प्रत्येकी दोन हजार रुपये देऊन प्रवास करत असल्याचे एका मजुराने सांगितले.