मोहोळ नगर परिषदेवर पाण्यासाठी घागर मोर्चा
By दिपक दुपारगुडे | Published: February 9, 2024 07:54 PM2024-02-09T19:54:55+5:302024-02-09T19:55:07+5:30
परिषदेच्या ढिसाळ नियोजनामुळे शहरवाशीयांना पाणी टंचाईला तोंड देण्याची वेळ आली आहे.
सोलापूर: मोहोळ शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या आष्टे कोळेगाव बंधाऱ्यात पाणी आसताना केवळ नगर परिषदेच्या ढिसाळ नियोजनामुळे शहरवाशीयांना पाणी टंचाईला तोंड देण्याची वेळ आली आहे. नगर परिषदेच्या विरोधात माजी नगराध्यक्ष रमेश बारसकर यांच्या नेतृत्वाखाली शहरातील विविध भागातील महिलांचा घागर मोर्चा काढण्यात आला. तसेच नगर परिषदेसमोर शंकनाद आंदोलन करून मडकी फोडण्यात आली.
यावेळी बारसकर म्हणाले, नगर परिषदेचा कारभार अकार्यक्षम आहे. त्यांना शहराचा पाणी प्रश्न हाताळण्यात अपयश आले आहे. शहरातील धनगर गल्ली, तांबडी माती, नागनाथ मंदिर परिसरात गेली अनेक दिवसांपासून पिण्याचे पाणी येत नाही. याला केवळ नगरपरिषदेचे प्रशासनच जबाबदार आहे. येत्या दोन दिवसात पाण्याची सोय न झाल्यास या पेक्षाही महिलांचा मोठा मोर्चा नगरपरिषदेवर येईल असा इशारा त्यांनी दिला. नागरिकांना लाईट, पाणी, रस्ते यासह अग्निशमन सेवा मिळत नसतानाही त्याचा कर मात्र जोरदार वसूल केला जात आहे. स्वतःच्या घरातच भाड्याने राहण्याची परिस्थिती शहरवासीयावर ओढवली आहे. घरपट्टी, गाळा भाडे, नळ पट्टी न भरल्याने गाळ्यांना कुलूप लावण्याचे काम नगरपरिषद प्रशासनाने केले आहे. नागरिकांच्या समस्येसाठी आमची दोन हात करण्याची तयारी असल्याचा इशाराही बारसकर यांनी यावेळी दिला. यावेळी रियाज शेख मंगेश पांढरे, शीलवंत क्षीरसागर, संतोष सलगर आदीसह बहुसंख्य कार्यकर्ते उपस्थित होते. महिलांचाही मोठा सहभाग होता.