सोलापूर : तुरीच्या काढणीचा खर्च परवडत नाही म्हणून गतवर्षी तुरीच्या उभ्या पिकाला पेटवून देणाºया अक्कलकोट तालुक्यातील बासलेगांव येथील शेतकºयाने यंदा धाडस करून २१ एकरात २१० क्विंटल इतके तुरीचे विक्रमी उत्पादन घेतले आहे. कर्नाटकात तुरीला महाराष्टÑापेक्षा जास्त प्रती क्विंटल ६१०० हमीभाव असल्याने या शेतकºयाने पुन्हा तूर पिकविण्याचे धाडस केले आहे.
गतवर्षी पाऊसमान चांगला असल्याने राज्यात तुरीचे बंपर उत्पादन झाले होते़ त्यामुळे तुरीचा बाजारभाव अतिशय कमी झाला होता़ राज्य सरकारने शेतकºयांच्या मागणीमुळे राज्यात ठिकठिकाणी तूर खरेदीची केंद्रे सुरू केली होती़ तुरीला प्रति क्विंटल ४५०० रुपये हमीभाव जाहीर केला होता, तरीही व्यापाºयांनी ३ हजार ते ३ हजार ३०० रुपये क्विंटल दराने तुरीची खरेदी सुरू केली़ राज्यभर या प्रकाराचा शेतकºयांनी निषेध नोंदवला़ अक्कलकोट तालुक्यातील बासलेगाव येथील शेतकरी शशिकांत बिराजदार यांनी दहा एकरांवर तुरीचे पीक घेतले होते़ तुरीच्या काढणीचा खर्च आणि तुरीचा बाजारातील दर यांचा ताळमेळ बसत नसल्याने बिराजदार यांनी दहा एकर क्षेत्रातील तुरीचे उभे पीक पेटवून दिले आणि शासनाचा निषेध नोंदवला होता.
यंदा शशिकांत बिराजदार यांनी पुन्हा दहा एकर क्षेत्रात तुरीचे पीक घेतले़ २४ जून रोजी पिंकू या वाणाची टोकन पद्धतीने लावण केली़ जून-जुलै महिन्यात पावसाचे प्रमाण बºयापैकी होत़े़ त्यामुळे तुरीचे पीक जोमदार आले़ आॅगस्ट-सप्टेंबर महिन्यात पावसाने ओढ दिली़ त्यामुळे बिराजदार यांनी एक पाण्याची पाळी दिली़ मजुरांचा प्रश्न गंभीर असल्याने ट्रॅक्टरच्या साह्याने दोन वेळा कुळव मारले़ कीड व्यवस्थापनासाठी तीन वेळा कीटकनाशकाची फवारणी केली़ वातावरण आणि हवामान उत्तम असल्याने तुरीची चांगली वाढ झाली़ नुकतीच या तुरीची हार्वेस्टरच्या साह्याने काढणी करण्यात आली आहे.
२१ एकरांत २१० क्विंटल तुरीचे उत्पादन झाले आहे़ महाराष्ट्रात तूर खरेदी केंद्रे सुरू करण्यात आली आहेत़ तरीही व्यापारी शेतकºयांकडून अतिशय कमी दराने तुरीची खरेदी करीत आहेत़ कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सुरू झालेला हमीभाव केंद्रात आजही तुरीचे दर कमीच आहेत. राज्यात ४५०० रुपये प्रतिक्विंटल दराने तूर खरेदी केली जाते तर कर्नाटकात ६१०० रुपये दर आहे़ एका खातेदाराच्या नावे २० क्विंटल तूर खरेदी केली जाते. त्यामुळे सीमावर्ती भागातील अक्कलकोट-दक्षिण सोलापूर तालुक्यातून अनेक शेतकरी आपली तूर कर्नाटकात विक्रीसाठी पाठवत आहेत़ नातलगांच्या नावे या तुरीची विक्री करण्यात येत आहे़
लक्ष वेधले; पण पणन विभागाने दुर्लक्ष केले!महाराष्ट्र आणि कर्नाटकात हमी भाव केंद्रात खरेदी केल्या जाणाºया तुरीचे दर वेगवेगळे असल्याने महाराष्ट्रातील शेतकरी नाराजी व्यक्त करीत आहेत़ शशिकांत बिराजदार यांनी याप्रकरणी शासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला़ परंतु अक्कलकोट कृषी उत्पन्न बाजार समितीने आणि पणन विभागाने त्यांना बेदखल केले़ त्यामुळेच ही तूर कर्नाटकाच्या केंद्रात विकण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे़