बाटलीने पाणी घालून माढ्यातील विद्यार्थी जगवितात झाडे; पक्ष्यांसाठी सुरू केली पाणपोई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 4, 2019 12:34 PM2019-03-04T12:34:10+5:302019-03-04T12:37:25+5:30
माढा : माढ्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थी पर्यावरणाची जाण जोपासत आहेत. रिकाम्या बिसलरी पाण्याच्या बाटल्या गोळा करून त्या ...
माढा : माढ्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थी पर्यावरणाची जाण जोपासत आहेत. रिकाम्या बिसलरी पाण्याच्या बाटल्या गोळा करून त्या माध्यमातून शाळेच्या परिसरात असलेल्या झाडांना जगविण्याचे काम हे प्राथमिक शाळेचे विद्यार्थी करीत आहेत़ पर्यावरणाचे धडे केवळ पुस्तकातूनच न गिरविता प्रत्यक्षात पर्यावरणासाठी झटणाºया या बालकांचे कौतुक होत आहे.
या जिल्हा परिषद मुलांच्या शाळेत पहिली ते सहावीपर्यंत अडीचशे विद्यार्थी शिकतात. या मुलांना मूल्य शिक्षणाचे धडे शाळेत रोजच दिले जातात. काही दिवसांपूर्वी व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष धैर्यशील भांगे यांच्या मार्गदर्शनाखाली शाळेच्या परिसरात मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण करण्यात आले. आपण लावलेल्या वृक्षांची आणि सभोवताली दिसणाºया वृक्षांची काळजी घेणे प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य असल्याची भावना विद्यार्थ्यांच्या मनावर बिंबविण्यात आली.
व्यवस्थापन समिती व मुख्याध्यापिका मालती तळेकर यांच्यासह शिक्षकांनी झाडांचे महत्त्व विद्यार्थ्यांना पटवून दिले. यातूनच या विद्यार्थ्यांना झाडांचा लळा लागला आहे. शाळेच्या सुट्टीत खेळण्याबागडण्यासोबतच ही मुले आनंदाने या झाडांची काळजी घेत असल्याचे चित्र दिसत आहे. रिकाम्या पाण्याच्या बाटल्या गोळा करून त्या माध्यमातून झाडांच्या मुळाशी हे विद्यार्थी पाणी देत असतात. झाडाला आळी करून बाटलीने पाणी देण्याचे काम हे विद्यार्थी करतात. शाळा चालू असेपर्यंतच नव्हे तर उन्हाळ्यातही झाडांना पाणी देण्याचा निश्चय विद्यार्थ्यांनी केला आहे.
पक्ष्यांसाठी पाणपोईसुद्धा
- काही विद्यार्थ्यांनी झाडाला पाणी भरलेले मडके बांधून पक्ष्यांसाठी पाणपोई सुरू केली आहे. विद्यार्थ्यांच्या उपक्रमाचे परिसरात कौतुक केले जात आहे. झेडपीची शाळा असतानादेखील येथे लोकवर्गणीतून लाखो रुपयांची कामे झाली आहेत. अद्ययावत संगणक कक्ष, जल शुद्धीकरण यासारख्या सोयी खासगी शाळेप्रमाणे येथे मिळत असल्याने विद्यार्थ्यांना मोठा फायदा होत आहे.