व्हिडीओ गेम खेळा अन् पर्यावरण वाचवा!
By ऑनलाइन लोकमत | Published: December 8, 2019 03:03 AM2019-12-08T03:03:36+5:302019-12-08T03:03:59+5:30
मॉरिशसमध्ये पुस्तकातील पर्यावरणाचा धडा मोबाइल गेमवर
- शीतलकुमार कांबळे
सोलापूर : मुलांना मोबाईलवरील गेमचे आकर्षण आहे. या गेमच्या माध्यमातून अभ्यास आणि पर्यावरणाचे संवर्धन हे दोन्ही उद्दिष्ट साध्य होऊ शकतात. नेमका हाच विचार वेदा डिन या सोलापूरकर युवतीने करीत ‘इको-वॉरियर्स’ गेम डेव्हलप केला आहे. तिने व तिचा पती ब्रायन डिन यांच्या या प्रयत्नाला आता युनेस्कोदेखील मदत करणार आहे. सध्या मॉरिशसमध्ये सुरू असलेला हा प्रकल्प भारतासह जगभर नेण्याचा वेदाचा मानस आहे.
सहा ते ११ वयोगटातील मुला-मुलींसाठी ‘इको-वॉरियर्स’ तयार करण्यात आला आहे. गेमच्या पहिल्या टप्प्यात समुद्रकिनाऱ्यावरील प्लास्टिक व इतर कचरा एकत्र केल्यास पॉइंट मिळतात. हा गेम तेथील विद्यार्थ्यांच्या अभ्यासावर आधारित आहे. मॉरिशस सरकारने तेथील विद्यार्थ्यांना मोफत टॅब्लेटसह हा गेम इन्स्टॉल करून दिला आहे. गेममुळे विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरणाविषयक जागृती होते. दुसºया टप्प्यात मुलांना आपल्या घरातील प्लास्टिक पुनर्वापरासाठी (रिसायकलसाठी) शाळेत आणून द्यावयाचे आहे.
५ किलो प्लास्टिक दिल्यानंतर विद्यार्थ्यांना इको-वॉरियर कॉमीक बुक मोफत देण्यात येते. या बुकमध्ये बेटावरील प्रवास व प्रदूषणाविरोधातील लढा यांच्या गोष्टी आहेत. तिसºया टप्प्यामध्ये रिसायकल केलेले प्लास्टिक व इतर कचरा वापरावयाचा आहे. ज्या कंपन्यांना प्लास्टिक हवे त्यांना ते देण्यात येते. या कंपन्या त्यांच्या गरजेनुसार दर महिन्याला प्लास्टिक शाळांकडून घेतील. त्याचा वापर रस्त्याच्या किंवा इतर बांधकामात केला जातो.
वेदा डिनचे शालेय शिक्षण सोलापुरात
वेदा डिन या विद्या लोलगे यांची मुलगी आहे. वेदाचे दहावीपर्यंतचे शिक्षण सोलापुरातील लिटील फ्लॉवर शाळेत झाले. पुण्यात आल्यानंतर आर्ट आणि डिझाईन कम्युनिकेशनचे शिक्षण घेतले. त्यानंतर आपल्या कलेला आणखी मोठे विश्व उघडता यावे यासाठी बिझनेस अॅडमिनिस्ट्रेशन आणि डेव्हलपमेंटचा अभ्यासक्रम पूर्ण केला. २०१४ मध्ये पुण्यात कंपनीची सुरुवात केली. या कंपनीचे मुख्य कार्यालय आता मॉरिशसमध्ये आहे. वेदाच्या या कामगिरीमुळे तिला ‘फिमेल रोल मॉडेल २०१९’ हा साऊथ आफ्रिका स्टार्टअप पुरस्कार देण्यात आला.
2,00,000 मुलांचा सहभाग
युनेस्कोने १९ जून, २०१९ रोजी या संदर्भात करार केला असून, ४१७ खासगी आणि सरकारी शाळांमध्ये हा प्रकल्प सुरू आहे. ६ ते ११ वर्षे वयोगटांतील सुमारे २ लाख विद्यार्थी सध्या हे अॅप वापरत आहेत. कचरा गोळा करण्याची प्रक्रिया ख्रिसमसनंतर सुरू होणार आहे.
आपल्या देशामध्ये प्रदूषण ही खूप मोठी समस्या आहे. यावर आळा घालायचा असेल, तर लहान मुलांना त्यांच्या शालेय जीवनातच पर्यावरणाचे महत्त्व पटवून द्यायला हवे. याचा विचार आमच्या मनात आला. मुलांना गेमचे आकर्षण असल्याने याच मार्गाचा वापर केला. एखाद्या व्हिडीओ गेमला युनेस्कोने सहकार्य करणे ही पहिलीच वेळ आहे.
- वेदा डिन, प्रशासकीय संचालक, पांडा अँड वोल्फ होल्डिंग.