सोलापूरमध्ये पोलिसांनी बनविले पोलिसांसाठी ऑक्सिजन हॉस्पिटल
By ऑनलाइन लोकमत | Published: May 5, 2021 01:08 AM2021-05-05T01:08:37+5:302021-05-05T01:09:13+5:30
कोरोनाकाळात दिलासा; राज्यातील पहिलाच उपक्रम
अप्पासाहेब पाटील
लोकमत न्यूज नेटवर्क
सोलापूर : कोरोनासारख्या महामारीच्या काळात सगळे लोक घरात बसलेले असताना कुटुंबासह स्वत:च्या जीवाची पर्वा न करता अहोरात्र बंदोबस्तावर काम करणाऱ्या पोलिसांसाठी सोलापूरच्या पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी पोलिसांसाठी पंढरपूर येथे ऑक्सिजन हॉस्पिटल निर्माण केले. पोलिसांनी पाेलिसांसाठी उभारलेल्या रुग्णालयाचा हा राज्यातील पहिलाच प्रयोग आहे.
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत अनेक रुग्णांना बेड, रेमडेसिविर इंजेक्शन, ऑक्सिजन , व्हेंटिलेटर बेड मिळत नसल्याचे धक्कादायक चित्र समोर दिसत असतानाच बेड व उपचारासाठी पोलीस अधिकारी, कर्मचारी व त्यांच्या कुटुंबातील नातेवाईकांना कोणत्याही रुग्णालयात हेलपाटे मारावे लागू नयेत, याच हेतूने पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी सोलापुरात ३० बेडचे कोविड केअर सेंटर व पंढरपुरात ६० बेडचे ऑक्सिजन हॉस्पिटल उभे केले. लाईफलाईन हॉस्पिटलच्या मदतीने रुग्णांवर उपचार करण्यात येत आहेत.
सद्यस्थितीला पोलीस अधिकारी अन् कर्मचाऱ्यांचे ९० टक्के कोरोना लसीकरण पूर्ण झाले आहे. त्यामुळे कोरोनाबाधित पोलिसांच्या संख्येत घट होत आहे. मात्र, त्यांच्या कुटुंबातील कोरोनाबाधित रुग्णांवर पंढरपुरातील ऑक्सिजन हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.
११० जणांनी केली कोरोनावर मात...
nपोलीस अधिकारी, कर्मचारी, कुटुंबातील इतर लोकांबरोबरच सर्वसामान्य नागरिकांवर ऑक्सिजन हॉस्पिटलमधील ६० बेडवर उपचार होत आहेत.
nआतापर्यंत या हॉस्पिटलमधून उपचार घेऊन ११० जणांनी कोरोनावर मात केली आहे. सध्या ४२ जणांवर उपचार सुरू आहेत. त्यात फक्त १ पोलीस कर्मचारी आहे, बाकीचे पोलिसांच्या कुटुंबातील नातेवाईक आहेत.
....हा तर माझा परिवार
बेडसाठी पोलीस व त्यांच्या कुटुंबातील लोकांना इतरत्र फिरावे लागू नये, यासाठी ऑक्सिजन हॉस्पिटलची निर्मिती केली आहे. सामाजिक भावनेतून याच हॉस्पिटलमध्ये सर्वसामान्य नागरिकांवरही उपचार होत आहेत. सोलापूर ग्रामीण पोलीस दल हा माझा परिवार आहे. परिवाराची प्रमुख म्हणून माझ्या परिवारातील लोकांची काळजी घेणे माझे कर्तव्यच आहे.
- तेजस्वी सातपुते, पोलीस अधीक्षक, सोलापूर ग्रामीण.