सिद्रामप्पांचा आरोप, ‘पालकमंत्र्यांनी त्रास दिला,’ पालकमंत्र्यांचं प्रत्युत्तर, ‘कोण पाटील ओळखत नाही !’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 19, 2019 10:14 AM2019-03-19T10:14:39+5:302019-03-19T10:20:58+5:30
अक्कलकोट : जिल्ह्याचे पालकमंत्री विजयकुमार देशमुख व खासदार शरद बनसोडे यांच्या सुरुवातीच्या काळात मीच त्यांना उमेदवारी मिळवून दिली; मात्र ...
अक्कलकोट : जिल्ह्याचे पालकमंत्री विजयकुमार देशमुख व खासदार शरद बनसोडे यांच्या सुरुवातीच्या काळात मीच त्यांना उमेदवारी मिळवून दिली; मात्र त्यांनी मला वेळोवेळी त्रास देण्याचा व गैरसमज पसरवण्याचा प्रयत्न केला. आगामी लोकसभा निवडणुकीत कोणत्या पक्षाचे काम करायचे ते प्रसंगानुसार ठरवू असे मत माजी आमदार सिद्रामप्पा पाटील यांनी व्यक्त केले. त्यावर प्रतिक्रिया देताना पालकमंत्री विजयकुमार देशमुख म्हणाले, ‘कोण सिद्रामप्पा पाटील, ओळखत नाही.’
अक्कलकोट येथील निवासस्थानी आयोजित कार्यकर्त्यांच्या विचारविनिमय बैठकीत ते बोलत होते. बैठकीच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ नेते सुरेश सूर्यवंशी हे होते. व्यासपीठावर जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष शिवानंद पाटील, बाजार समितीचे सभापती संजीवकुमार पाटील, शिवयोगी स्वामी, उपसभापती आप्पासाहेब पाटील, अंबण्णा भंगे, बसलिंगप्पा थंब, चनबसप्पा कवटगीमठ आदीजण होते.
पाटील म्हणाले, सन २००४ मध्ये स्व. गोपीनाथ मुंडे यांना सांगून सोलापूर उत्तर विधानसभा मतदारसंघात विद्यमान पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांना उमेदवारी मिळवून दिली. तसेच विद्यमान खासदार शरद बनसोडे यांनाही ज्येष्ठ नेते खडसे, मुंबईचे आ. आशिष शेलार यांना भेटून उमेदवारी मिळवून दिली. तेव्हा तर मी लिफ्टमध्ये अडकून पडलो होतो. या लोकांनी माझ्या उपकारांची जाणीव ठेवण्याऐवजी मला गेल्या साडेचार वर्षांत वेळोवेळी विविध प्रकारचा त्रास दिला.
कुंभारीतील खून खटल्यात कोणी प्लॅन रचून त्रास दिला आहे, हे मला माहिती आहे. पंचायत समिती सभापती असताना १९९२ मध्ये व १९९७ मध्ये मुंबई येथे व्ही. टी. स्टेशनवर गोळीबार झाला. त्यावेळी आमच्या जवळच्या लोकांनी घटना घडवून आणल्याचा गौप्यस्फोट त्यांनी केला. राजकारणात सतत घरात बसलेल्या लोकांनीच मला त्रास दिला. क्रूरकर्मा लोकांना हद्दपार करण्यासाठी ताकदीची गरज असल्याचे सांगितले.
यावेळी उपाध्यक्ष शिवानंद पाटील, परमेश्वर अरबळे, सुधीर लांडे, डॉ. शरणू काळे, अरविंद ममनाबाद यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी महेश पाटील, सिद्धाराम बाके, दरेप्पा जकापुरे, हळेप्पा खेड, भीमाशंकर धोत्री, जलील बागवान, राजकुमार बंदीछोडे, गिरमला गंगोंडा, परमेश्वर झळकी, काशिनाथ कोडते, देवेंद्र बिराजदार , धोंडप्पा यमाजी, मतीन पटेल, आणप्पा याबाजी, विठ्ठल सुरवसे, संजय डोंगराजे, सुभाष बिराजदार उपस्थित होते. सूत्रसंचालन भीमाशंकर वाघमोडे, तर आभार महादेव पाटील यांनी मानले.
पक्षातील गद्दारांना जोड्याने मारा
भाजपचे तालुकाध्यक्ष सचिन कल्याणशेट्टी व माजी नगराध्यक्ष बसलिंगप्पा खेडगी यांना माझ्याकडे येण्यापासून रोखण्याचे काम गोल्डन गँग करते. तुम्हाला उमेदवारी मिळाल्यानंतर काम करणार नसल्याचे धमकवतात. हे दोघे सुद्धा माझ्या सहकार्याशिवाय आमदार होणे अशक्य आहे. खेडगी यांनी मला वेळोवेळी अक्कलकोट शहरात मताधिक्य मिळवून दिले; मात्र आज बैठकीला बोलावूनही ते गैरहजर राहिले. माझ्या राजकीय सुरुवातीपासून कै. काशिराया पाटील व महादेवराव पाटील हे सतत डावपेच आखत राजकीय अडसर ठरत होते. ते माझ्यासाठी छुपी सुरी होते असाही आरोप सिद्रामप्पा यांनी केला. गोल्डन गँग माझ्याजवळ येणाºयांना नेहमी राजकारणाची भीती दाखवत पोळी भाजून घेत आहे. मी आमदारकीला उभारल्यानंतर पक्षातील ज्या पुढाºयांच्या गावात काँग्रेसला मताधिक्य आहे, अशा गद्दारांना जोड्याने मारावे. हेच लोक प्रत्येक निवडणुकीत डल्ला मारतात असा आरोप सिद्रामप्पा पाटील यांनी केला.
मोदींवर टीका करताच गोंधळ
ज्येष्ठ नेते अंबण्णा भंगे यांनी बोलताना मोदींची फसवी कर्जमाफी व अनुदान कोणालाच जमा झाले नसल्याचे सांगताच भाजपचे अनेक कार्यकर्ते खोटे बोलू नका असे म्हणत त्यांच्यावर तुटून पडले. त्यामुळे त्यांचे मनोगत थांबवावे लागले. तोळणूरचे चनबसप्पा कवटगीमठ यांनी गोल्डन गँग पक्षात विष पेरत आहेत असल्याचा आरोप केला.
सिद्रामप्पा पाटील यांचा आरोप हास्यास्पद आहे. मी त्यांना ओळखत नाही. त्यामुळे त्यांना त्रास देण्याचा प्रश्नच येत नाही. भारतीय जनता पार्टीमध्ये मी ३0 वर्षांपासून काम करतोय. कार्यकर्ता ते मंत्रीपदापर्यंत मला कार्यकर्त्यांनी पोहोचविले. माझ्या कामाची दखल घेत पक्षाने मला पदे दिली आहेत.
-विजयकुमार देशमुख, पालकमंत्री