एल. डी. वाघमोडे
माळशिरस : माढा लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादीचे अध्यक्ष, माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांना निवडणूक लढविण्याच्या निर्णयाचे खासदार विजयसिंह मोहिते-पाटील यांच्यासह जिल्ह्यातील नेत्यांनी स्वागत केले आहे. मात्र दुसरीकडे मोहिते-पाटील समर्थकांनी सोशल मिडीयावर या विरोधात रान पेटविण्यास सुरुवात केली आहे.
सोशल मिडीयावर अनेक कार्यकर्त्याच्या पोस्ट, आॅडिओ रेकॉर्डिंग व्हायरल होत आहेत. पवार साहेबांनी मोहिते-पाटील विरोधकांचं ऐकून माढ्यातून उमेदवारी घेतली, चार खासदारांवर पंतप्रधान होऊ शकतील काय, त्यांना आमचा विरोध नाही, तुम्हाला निवडणूकच लढवायची होती, तर बारामती मतदारसंघात का नाही उभे राहिलात, मोहिते-पाटलांना अनेक पक्षात मानणाºया नेतेमंडळींचा गट आहे. मात्र त्यांचा अबोला व संयमी स्वभावाचा फायदा पवार किती दिवस घेणार, रणजितसिंह मोहिते-पाटलांनी विरोधी निर्णय घेण्याची गरज आहे, असा सूर काढला जात आहे.
माढा लोकसभा मतदारसंघासाठी राष्ट्रवादीच्या उमेदवारांची चर्चा गेल्या अनेक दिवस रंगली होती. अनेक इच्छुकांनी आपली ताकद पणाला लावली, मात्र ऐनवेळी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांच्या नावाची चर्चा पुढे आली. नेतेमंडळींनी त्यांनाच उमेदवारीसाठी आग्रह केला असला तरी आपल्या अनेक दिवसांच्या परिश्रमावर पाणी सोडताना मोहिते-पाटील समर्थकांच्या मनातली खदखद सोशल मीडियाच्या माध्यमातून पुढे येताना दिसत आहे.
पक्षाकडून मोहिते-पाटलांची झालेली परवड, मानापमान यासाठी खुद्द मोहिते-पाटलांनी संयम बाळगला असला तरी कार्यकर्त्यांचा संयम सुटू लागल्याचे दिसत आहे. विजयसिंह मोहिते-पाटील गेली दोन दिवस शरद पवार यांच्यासोबतच आहेत. पवारांवर आपला विश्वास असल्याचेही ते सांगत आहेत. माजी खासदार रणजितसिंह मोहिते-पाटील, धैर्यशील मोहिते-पाटील यांनी यासंदर्भात जाहीर प्रतिक्रिया दिलेली नाही. मात्र पुण्यातील बैठकीत रणजितसिंहांनीही पवारांच्या उमेदवारीची मागणी केल्याची उत्तरे पवार गटाकडून मोहिते-पाटील समर्थकांना दिली जात आहेत.
राष्ट्रवादी सोडा नातेपुतेच्या कार्यक्रमात कार्यकर्त्यांचा आग्रहमाळशिरस तालुक्यातील नातेपुते येथे झालेल्या जाहीर कार्यक्रमात काही कार्यकर्त्यांनी विजयदादांना बोलताना रोखण्याचा प्रयत्न केला. प्रथम तुम्ही निवडणूक लढविणार आहात की नाही ते सांगा. तुम्हीच निवडणूक लढायला हवी. शरद पवारांना बारामतीचा मतदारसंघ आहे. माढा मतदारसंघासाठी त्यांनी काय काम केले आहे. हवं तर तुम्ही राष्ट्रवादी सोडा, पण निवडणूक लढवा, अशी मागणी केली. पण विजयदादांनी कार्यकर्त्यांना शांत केले. पवारांना मीच आग्रह केला आहे. माझा त्यांच्यावर विश्वास आहे, असे सांगितले. सोशल मिडीयावर माढ्यातील चोपडे व पुरंदर तालुक्यातील जाधव, गोरडवाडीचे मच्छिंद्र कर्णवर यांच्या आॅडिओ क्लीप व्हायरल झाल्या आहेत. यात त्यांनी पवारांबद्दल आदर व्यक्त केला आहे, मात्र विजयदादांना डावलू नये, असे सांगितले आहे.