सोलापूर : पोस्टातून पूर्वी पत्र आणि मनिऑर्डरची सेवा देणाऱ्या टपाल कार्यालयाने डिजिटल क्षेत्रात पदार्पण करत, कॉमन सर्व्हिस सेंटर अंतर्गत सरकारी सेवा सुरू करण्यात आल्या आहेत. या अंतर्गत नागरिकांना वेगवेगळ्या २०० सेवा मिळणार आहेत. यामध्ये जन्म-मृत्यू प्रमाणपत्र, निवडणूक ओळखपत्र, वीज बिल, शिष्यवृत्ती, पॅनकार्ड, पासपोर्ट, स्वच्छ भारत अभियान, पंतप्रधान आवास योजना, प्रधानमंत्री पीक विमा, जीएसटी, टीडीएस, ई-चलन, विमा, फास्टॅग सेवा अशा अनेक योजनेचा समावेश करण्यात आला आहे.
ग्रामीण भागातील नागरिकांना एखादे प्रमाणपत्र घेण्यासाठी जिल्ह्याच्या ठिकाणी अथवा तालुक्याच्या ठिकाणी यावे लागत होते, मात्र पोस्टाने सुरु केलेल्या योजनेमुळे आपल्या गावाजवळच सेवा देण्यासाठी टपाल कार्यालयाने ही सुविधा उपलब्ध केली आहे. सोलापूर आणि पंढरपूर विभागातील प्रमुख टपाल कार्यालयांमध्ये आणि मोहोळ, अक्कलकोट, बार्शी, गुरुनानक नगर (सोलापूर), वैराग आणि मंद्रुप येथे कॉमन सर्व्हिस सेंटर सुरू केले आहे. सरकारी कार्यालयातील एक खिडकी योजनेंतर्गत मिळणाऱ्या सर्व सुविधा नागरिकांना पोस्टातून मिळणार आहेत. त्यामुळे नागरिकांचा वेळ आणि पैसे देखील वाचणार आहे.
आता पोस्टाचीही पेन्शन योजना
भारतीय पोस्ट अंतर्गत नॅशनल पेन्शन स्किम आणली असून म्युचुअल फंड बेस असलेल्या या योजनेतून बचत व पेन्शन असा दुहेरी लाभ आहे. १८ ते ६० वर्षे असलेल्या नागरिकांना योजनेत सहभाग नोंदवता येतो. वर्षाला किमान सहा हजार रुपये हफ्ता भरण्याची सोय त्यामध्ये आहे. वय साठ वर्षे झाल्यानंतर एकूण जमा रकमेच्या साठ टक्के रक्कम काढता येते. उर्वरित चाळीस टक्के रक्कम पेन्शन योजनेच्या लाभासाठी वळवून त्यातून पेन्शन दिली जाणार आहे. या योजनेस चांगला प्रतिसाद मिळत आहे.
सोलापूर विभागातील ८ कार्यालयात या योजनेची सुरुवात झाली असून आणखीन १८ कार्यालयात या योजनेची सुरुवात करण्यात येत आहे. नागरिकांना गावाजवळ सेवा मिळण्याच्या दृष्टीने सेवा सुरु केली आहे.
- एस.एस.पाठक, प्रवर अधीक्षक, डाकघर सोलापूर