अकोला- भारिप बहुजन महासंघाचे नेते प्रकाश आंबेडकर सोलापुरातून निवडणूक लढवण्याची शक्यता आहे. मी सोलापुरातून निवडणूक लढवावी, अशी इच्छा बहुजन वंचित आघाडीचे नेते लक्ष्मण माने यांची आहे, असंही प्रकाश आंबेडकरांनी सांगितलं आहे. बहुजन वंचित आघाडीच्या अकोल्यातील पत्रकार परिषदेत प्रकाश आंबेडकरांनी ही माहिती दिली आहे. परंतु निवडणूक कुठून लढवणार यासंदर्भात प्रकाश आंबेडकरांनी अद्याप कोणताही खुलासा केलेला नाही. पण प्रकाश आंबेडकर सोलापुरातून लढल्यास काँग्रेसचे दिग्गज नेते सुशीलकुमार शिंदेंच्या अडचणीत वाढ होणार आहे. सोलापूर लोकसभा मतदारसंघ सध्या भाजपाकडे आहे. भाजपाचे शरद बनसोडे हे सोलापुरातून विद्यमान खासदार आहेत. बनसोडे यांनी मोदी लाटेत 2014च्या लोकसभा निवडणुकीत सुशीलकुमार शिंदे यांना पराभूत करून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला होता. गेल्या अनेक दिवसांपासून काँग्रेस आणि प्रकाश आंबेडकरांमध्ये आघाडीसंदर्भात बैठका सुरू आहे. प्रकाश आंबेडकरांनी काँग्रेस आघाडीकडे 22 जागांची मागणी केली आहे. परंतु काँग्रेस प्रकाश आंबेडकरांना तेवढ्या जागा देण्यास तयार नाही. बहुजन वंचित आघाडीला 22 जागा द्यायच्या, राजू शेट्टी यांना दोन जागा द्यायच्या, अन्य मित्रपक्षांना एक-दोन जागा दिल्यावर शिल्लक राहणाऱ्या दहा-बारा जागा आम्ही वाटून घ्यायच्या का, असा सवाल बैठकीत विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे व प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी केला होता. बहुजन वंचित आघाडी 22 जागांमध्ये नांदेड, बारामती आणि माढा या तीन जागा मागत आहे.त्या बैठकीत लक्ष्मण माने म्हणाले होते की, मसुदा काय असावा यावर चर्चा झाली आहे, मात्र अंतिम निर्णय व्हायचा आहे. राहुल गांधी आणि प्रकाश आंबेडकर यांच्या भेटीत पुढील निर्णय होईल. आम्ही 22 जागांवर उमेदवार जाहीर केले आहेत, त्या 22 जागा आम्हाला मिळाल्या पाहिजेत, अशी आमची भूमिका आहे.
प्रकाश आंबेडकर सोलापुरातून लढणार ?
By ऑनलाइन लोकमत | Published: March 11, 2019 10:33 AM