सोलापूर विद्यापीठातील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्मारक कामाचे मंत्रालयात सादरीकरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 17, 2021 04:30 PM2021-11-17T16:30:23+5:302021-11-17T16:33:54+5:30

उपमुख्यमंत्री अजित पवारांची उपस्थिती

Presentation of Punya Shlok Ahilya Devi Holkar's Memorial at Solapur University at Mantralaya | सोलापूर विद्यापीठातील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्मारक कामाचे मंत्रालयात सादरीकरण

सोलापूर विद्यापीठातील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्मारक कामाचे मंत्रालयात सादरीकरण

Next

सोलापूर :- पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांनी आपल्या संस्थानाबाहेर जावून विकासकार्य केलं. जात, धर्म, पंथ, प्रांताच्या सीमा ओलांडून देशभऱ पायाभूत सुविधांची निर्मिती केली. साडेतीनशे वर्षांपूर्वी राजकीय, प्रशासकीय, न्यायदानाच्या पद्धतीत अमूलाग्र सुधारणा घडवून आणल्या. दूरदृष्टीच्या शासक, जगातल्या सर्वश्रेष्ठ स्त्री राज्यकर्त्या म्हणून राजमातांनी केलेलं कार्य अलौकिक आहे. सोलापूरच्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापीठात उभारण्यात येत असलेलं स्मारक राजमातांच्या कार्यकर्तृत्वाला साजेसं आणि गौरव वाढवणारं असलं पाहिजे. अशा सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज मंत्रालयात आयोजित बैठकीत दिल्या. स्मारकाचं काम आकर्षक, दर्जेदार झालं पाहिजे, अशी अपेक्षा व्यक्त करतानाच स्मारकासाठी निधीची कमतरता भासू दिली जाणार नाही, अशी ग्वाहीही उपमुख्यमंत्र्यांनी बैठकीत दिली.

सोलापूरच्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठात उभारण्यात येत असलेल्या राजमाता अहिल्यादेवींच्या स्मारकाचा आराखडा आणि कामाचे सादरीकरण आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मंत्रालयातील कार्यालयात करण्यात आले.  उपमुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीला सोलापूरचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे, नियोजन विभागाचे अप्पर मुख्य सचिव देबाशिष चक्रवर्ती, उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे प्रधान सचिव विकास रस्तोगी, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या कुलगुरु डॉ. मृणालिनी फडणवीस (व्हिसीव्दारे), विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. विकास घुटे (व्हिसीव्दारे), पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्मारक समितीचे सदस्य रविकांत हुक्केरी, बाळासाहेब पाटील (बंडगर), बाळासाहेब शेवाळे, श्रावण भावर, स्मारक समितीचे कार्यकारी अभियंता गिरीश कुलकर्णी, वास्तुविशारद दिनकर वराडे, काशिनाथ वराडे आदींसह वरिष्ठ अधिकारी व प्रतिनिधी उपस्थित होते. 

उपमुख्यमंत्री अजित पवार बैठकीत मार्गदर्शन करताना म्हणाले की, राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे कार्य अलौकिक आहे. राजमातांनी देशभरात रस्ते बांधले घाट, मंदिरं, धर्मशाळा, पाणपोयी उभारल्या. जलस्त्रोतांचे बळकटीकरण करण्यासाठी देशभरात उभारलेल्या बारवा, तलाव, विहिरी या स्थापत्य कलेचं आदर्श उदाहरण आहे. राजमाता अहिल्यादेवी या सर्वकालीन आदर्श स्त्री राज्यकर्त्या, दूरदृष्टीच्या प्रशासक आहेत. त्यांनी केलेलं कार्य राज्यकर्त्यांसाठी मार्गदर्शक, पुढील पिढ्यांना प्रेरणादायी आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचं सोलापूर विद्यापीठात उभारण्यात येत असलेलं स्मारक भावी पिढीला त्यांच्या कार्याची ओळख करुन देईल. प्रेरणा देईल. हे स्मारक पुढील शेकडो वर्षे दिमाखात उभं राहिलं पाहिजे. स्मारकासाठी वापरण्यात येणारे दगड, सामग्री ऐतिहासिक वास्तूंशी साधर्म्य सांगणारी असली पाहिजेत. स्मारक परिसरात मोठ्या प्रमाणावर झाडांची लागवड करावी. स्मारकात उभारण्यात येणारा राजमाता अहिल्यादेवींचा पुतळा हा विद्यापीठाजवळून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावरुन दिसेल असा उत्तराभिमूख उभारावा. स्मारकाची निर्मिती दर्जेदार पध्दतीने व्हावी, स्मारकाची निर्मिती करताना प्रत्येक बाब बारकाईनं, काळजीपूर्वक नियोजनपूर्वक करण्यात यावी. स्मारक भव्य आणि आकर्षक असलं पाहिजे. अहिल्यादेवींच्या अलौकिक कार्याचं प्रतिबिंब स्मारकात दिसलं पाहिजे, असी अपेक्षा व्यक्त करतानाच या स्मारकासाठी निधीची कमतरता भासू दिली जाणार नाही, अशी ग्वाहीही, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बैठकीत दिली.

 

Web Title: Presentation of Punya Shlok Ahilya Devi Holkar's Memorial at Solapur University at Mantralaya

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.