शेतकऱ्यांचा शेतीमाल व फळे देशाच्या बाजारपेठेत जलदगतीने उपलब्ध होण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी किसान रेल्वे सुरू केली. सांगोला रेल्वे स्टेशनमधून सध्या चार किसान रेल्वे सुरू आहेत. याला शेतकऱ्यांनी चांगला प्रतिसाद दिला असून, किसान रेल्वे शेतकऱ्यांसाठी वरदान ठरली आहे. यामुळे शेतकऱ्यांना कमी खर्चात शेतीमाल देशाच्या बाजारपेठेत पोहोचवणे सहज शक्य झाले आहे.
सांगोला-शालिमार (कोलकाता) ही किसान रेल्वे सोमवारी शंभरावी फेरी पूर्ण करणार आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या सोमवारी सायंकाळी ४.३० वाजता शंभराव्या फेरीला व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे हिरवा झेंडा दाखवणार आहेत. या कार्यक्रमाला सोलापूर रेल्वे मंडळ समितीचे अध्यक्ष खासदार रणजितसिंह निंबाळकर, भाजप जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख, सोलापूर मंडल रेल प्रबंधक शैलेश गुप्ता यांच्यासह रेल्वेचे अधिकारी उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमासाठी शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन तालुकाध्यक्ष चेतनसिंह केदार-सावंत यांनी केले आहे.