जिल्हाधिकाºयांनी नोटीस दिलेला खासगी डॉक्टर झेडपीत कामाला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 4, 2020 11:35 AM2020-06-04T11:35:17+5:302020-06-04T11:37:23+5:30
माहिती लपविली : पुन्हा एका नव्या कंत्राटी डॉक्टरची नियुक्ती
सोलापूर : सोलापूर शहरानंतर जिल्ह्यातही कोरोनाचे रुग्ण आढळून येत असताना जिल्हा परिषदेचा आरोग्य विभाग बेफिकीर असल्याचे दिसून येत आहे. मार्कंडेय रुग्णालय अधिग्रहित केलेले असताना कोरोना रुग्णाच्या सेवेत हजर न झालेल्या ३४ डॉक्टरांना जिल्हाधिकाºयांनी नोटीस दिलेली असून त्यातील एक डॉक्टर चक्क झेडपीच्या आरोग्य विभागात कंत्राटी सेवेत असल्याचे स्पष्ट झाले आहे.
गेल्या महिन्यात चपळगाव येथे कंत्राटी सेवेत असलेला डॉक्टर सोलापुरातील खासगी रुग्णालयात नोकरी करीत असल्याचे आढळले होते. त्या डॉक्टराला कोरोनाची बाधा झाल्यावर अक्कलकोट तालुक्यात खळबळ उडाली होती. त्यानंतर याबाबत ‘लोकमत’ने लक्ष वेधताच जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रकाश वायचळ यांनी त्या डॉक्टरासह आणखी एका डॉक्टरास काढून टाकले आहे.
जिल्हाधिकाºयांनी २९ मे रोजी मार्कंडेय रुग्णालयातील ३४ डॉक्टरांना कोरोना रुग्णाच्या सेवेत हजर राहण्याची नोटीस दिली आहे. यामध्ये नमूद असलेले डॉ. निरंजन तलकोकूल हे मार्डी प्राथमिक आरोग्य केंद्रात सेवा देत असल्याचे जिल्हा परिषदेच्या आरोग्य प्रशासनाकडून सांगण्यात आले.
त्यांना राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत कंत्राटी वैद्यकीय अधिकारी म्हणून सेवेत घेण्यात आलेले आहे. झेडपीने असे सेवेत घेतलेल्या डॉक्टरांना दुसरी खासगी नोकरी करता येत नसताना आता पुन्हा हा तिसरा प्रकार उघड झाला आहे.
विशेष म्हणजे अशा खासगी रुग्णालयातील डॉक्टरांना बाधा झाली आहे. हेच डॉक्टर ग्रामीण भागात सेवा देण्यास गेल्यावर कोरोनाचा प्रसार होण्याची दाट शक्यता असल्याबाबत चिंता व्यक्त होत आहे.
अशातच डॉ. निशीगंध जाधव यांची कंत्राटी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच वळसंग प्राथमिक आरोग्य केंद्राच्या हद्दीत कोरोनाचे रुग्ण वाढत असताना तेथील वैद्यकीय अधिकाºयास परस्पर जिल्हा आरोग्य केंद्रातील प्रशासकीय काम देण्यात आले आहे.
शिकाऊ डॉक्टरांना नोटीस
- मार्कंडेय रुग्णालयातील नोटीस दिलेले डॉक्टर शिकाऊ म्हणून सेवा देतात. इतर वरिष्ठ डॉक्टरांची यादी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे देण्यात आलेली नाही. तसेच जिल्हाधिकाºयांनी नोटीस दिलेली असताना जिल्हा परिषदेत हा प्रकार दडवून ठेवणाºयावर काय कारवाई होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. याबाबत माहिती विचारण्यासाठी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. जमादार यांना वारंवार संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी फोन रिसिव्ह केला नाही.