सोलापूरकराची 'आयडियाची कल्पना'; छत्रीच्या कापडापासून बनवली ४०० पीपीई किट
By ऑनलाइन लोकमत | Published: April 11, 2020 06:26 AM2020-04-11T06:26:43+5:302020-04-11T12:57:37+5:30
कोरोना विषाणूपासून डॉक्टरांचा बचाव
शीतलकुमार कांबळे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
सोलापूर : गरज ही शोधाची जननी आहे, असे म्हणतात. जगभरात पीपीई (पर्सन्स प्रोटेक्टिव्ह इक्विपमेंट) किटची खूप मोठ्या प्रमाणात गरज आहे. या किटचा तुटवडा असताना डॉक्टरांच्या या गरजेतूनच सोलापुरातील डॉ. माणिक गुर्रम यांनी सेफ्टी किट विकसित केले आहे. त्यांच्या रुग्णालयातील डॉक्टरांसोबतच इतर रुग्णालयातील डॉक्टरही हे किट वापरत आहेत. हे सोलापुरी सेफ्टी किट निर्माण केल्याच्या माहितीचा प्रसार होताच राज्यभरातून किटची मागणी वाढत आहे. या किटमुळे पायापासून ते डोक्यापर्यंत शरीर झाकले जाते.
पुनर्वापरही शक्य !
सुरुवातीला रेनकोटच्या कापडाचा पर्याय समोर होता, पण त्याचे कापड जाड असल्याने आत गरम होईल म्हणून छत्रीसाठी वापरण्यात येणारे कापड पाहिले. या कापडातून हवा व पाणी आत जात नाही, याची खात्री झाल्यावर सेफ्टी किट तयार करण्यात आले.
एक किटसाठी सरासरी सातशे ते आठशे रुपयांचा खर्च येतो. सोडियम हायड्रोक्लोराईडने हे किट स्वच्छ करता येते तर मिथेन आॅक्साईडने याचे निर्जंतुकीकरण करून किटचा पुनर्वापर करता येतो.