पुणे विभागात माढा पंचायत समितीला यशवंत पंचायत राज अभियानात मिळाला तिसरा क्रमांक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 26, 2021 02:59 PM2021-02-26T14:59:42+5:302021-02-26T15:00:27+5:30
तालुक्यात राबविण्यात आलेल्या विविध नाविन्यपूर्ण योजना व योग्य शासकीय निधीचा झालेल्या वापरामुळे मिळाला पुरस्कार
लक्ष्मण कांबळे/ कुर्डूवाडी
यशवंत पंचायत राज अभियान २०२०-२१ अंतर्गत राज्यातील उत्कृष्ट कार्याबद्दल माढा पंचायत समितीचा पुणे विभागात तिसरा क्रमांक आला आहे.याबाबत विभागीय आयुक्त कार्यालयाच्या वतीने उपायुक्त ( विकास) राजाराम झेंडे यांनी ही निवड जाहीर केली आहे.त्याचे पत्र येथील कार्यालयाला मिळताच पेढे वाटून पदाधिकारी,सर्व विभागाचे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी गटविकास अधिकारी डॉ संताजी पाटील यांचा प्रातिनिधिक स्वरूपात सत्कार करून आनंद साजरा केला.यावेळी कोरोनाच्या पार्श्वभूमीवरील सर्व नियमांचे पालन करण्यात आले.
माढा पंचायत समितीने यशवंत पंचायत राज अभियानात सहभाग नोंदवित भाग घेतला होता.त्यामुळे विभागीय आयुक्तांच्या आदेशानुसार कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा देसाई यांच्या पथकाने येथील पंचायत समितीच्या सर्व विभागांची नुकतीच तपासणी केली होती.त्यानंतर विभागातील अभियानातील सहभागी जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या विभाग स्तरावरील पुरस्कार बाबतीत २४ फेब्रुवारी पुणे आयुक्तालयात विभागीय आयुक्त यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली.त्यात कोल्हापूर जिल्हा परिषदेला २६९.६४ गुण मिळाल्याने जिल्हा परिषद विभागातून त्यांनी प्रथम क्रमांक पटकाविला.तर पंचायत समिती विभागातून कागल (जि.कोल्हापूर) या पंचायत समितीने २७६.७४ गुण मिळवून विभागात प्रथम क्रमांक पटकावला आहे,तर दुसराही क्रमांक कोल्हापूर जिल्ह्यातीलच गडहिंग्लज पंचायत समितीने २७०.५४ गुण मिळवून घेतला आहे. आणि तिसरा क्रमांक सोलापूर जिल्ह्यातील माढा पंचायत समितीने २६१.४८ गुण मिळवून पटकाविला आहे.या अभियानात राज्य शासनाकडुन मिळालेल्या निधीचा विनीयोग ,जि.प. सेस फंडाच्या योजनेतुन घेण्यात येणारे उपक्रम, ग्रामिण भागातील विकासा करता राबवण्यात आलेल्या योजना,राबविण्यात आलेले विविध उपक्रम,स्वच्छता, पंचायत समितीची इमारत यामुळे हा पुरस्कार येथील पंचायत समितीला मिळाला आहे.
माढा पंचायत समितीने या अभियानात तिसरा क्रमांक पटकाविल्याने सोलापूर जिल्ह्याचीही मान विभागात उंचावली असून यासाठी सभापती विक्रमसिह शिंदे,उपसभापती धनाजी जवळगे,गटविकास अधिकारी डॉ संताजी पाटील, बांधकामचे उपअभियंता एस.जे.नाईकवाडी, गटशिक्षणाधिकारी मारुती फडके,तालुका आरोग्य अधिकारी डॉ शिवाजी थोरात,पशुधन विकास अधिकारी डॉ.व्ही.एल.बागल, पाणीपुरवठा विभागाचे गफूर शेख,बालविकास प्रकल्प अधिकारी किरण सोमवंशी,विनोद लोंढे,सहायक प्रशासन अधिकारी सयाजी बागल,कनिष्ठ प्रशासन अधिकारी रमेश बोराडे,लेखाधिकारी अवघडे,समन्वयक दादासाहेब मराठे,बांधकामचे अधीक्षक महेश शेंडे,जलसंधारणच्या वरिष्ठ सहायक माधुरी पाटील यांनी परिश्रम घेतले.