पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या कुलगुरूंचा पासवर्ड हॅक; नापास विद्यार्थी केले पास, चौघे अटकेत
By ऑनलाइन लोकमत | Published: January 20, 2021 08:08 AM2021-01-20T08:08:05+5:302021-01-20T08:15:01+5:30
तत्कालीन परीक्षा व मूल्यमापन मंडळ संचालक श्रीकांत राजाराम कोकरे, यंत्रणा विश्लेषक प्रशांत रावसाहेब चोरमुले, ई सुविधा समन्वयक हसन मुबारक शेख, तत्कालीन प्रोग्रॅमर प्रवीण प्रकाश गायकवाड अशी गुन्हा दाखल झालेल्या चौघांची नावे आहेत.
सोलापूर : पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठातील कुलगुरूंच्या संगणकाचा मास्टर पासवर्ड हॅक करून नापास झालेल्या विद्यार्थ्यांचे गुण (मार्क) वाढविल्याप्रकरणी तत्कालीन परीक्षा नियंत्रकासह चौघांना अटक करण्यात आली. सायबर क्राईमने ही कारवाई केली. या प्रकरणात १०० विद्यार्थ्यांची माहिती गोळा करण्यात आली असून, त्यांच्यावरही गुन्हा दाखल होण्याची शक्यता आहे.
तत्कालीन परीक्षा व मूल्यमापन मंडळ संचालक श्रीकांत राजाराम कोकरे, यंत्रणा विश्लेषक प्रशांत रावसाहेब चोरमुले, ई सुविधा समन्वयक हसन मुबारक शेख, तत्कालीन प्रोग्रॅमर प्रवीण प्रकाश गायकवाड अशी गुन्हा दाखल झालेल्या चौघांची नावे आहेत. त्यांना २२ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे. कुलगुरूंच्या संगणकाला असलेला मास्टर पासवर्ड हॅक करून विद्यार्थ्यांचे गुण वाढवले जात असल्याचा प्रकार उघडकीस आला होता. एका विषयासाठी किमान २५ आणि जास्तीत जास्त ५० हजार रुपये घेतले जात होते, असे पोलिसांच्या तपासात पुढे येत आहे.
माझ्यावर आरोप झाला होता. त्यामुळे कमिटी बसविण्यात आली होती. कुलगुरुंचा मास्टर पासवर्ड माझ्यापर्यंत आलाच नाही. त्यामुळे मी त्याचा कधीच वापर केला नाही, असे कुलगुरू डॉ. मृणालिनी फडणवीस यांनी सांगितले.