कामाच्या गुणवत्तेबद्दल प्रश्नचिन्ह; लाख-दीड लाखांत होणाºया कामासाठी कोट्यवधी खर्च का?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 26, 2020 11:24 AM2020-08-26T11:24:23+5:302020-08-26T11:29:09+5:30
दोन तांत्रिक सल्लागारांना तत्काळ हटवा, पालिका आयुक्तांचे आणखी एक नवे पत्र
राकेश कदम
सोलापूर : महापालिकेचे अधिकारी जे काम लाख-दीड लाख रुपयांमध्ये करुन घेऊ शकले असते, त्यासाठी स्मार्ट सिटी कंपनी आज दरमहा कोटी रुपये मोजत आहे. तीन सल्लागार कंपन्यांपैकी क्रिसील आणि एसजीएस या दोन कंपन्यांना तत्काळ हटवण्यात यावे. यासंदर्भातील प्रस्ताव स्मार्ट सिटीच्या संचालक मंडळासमोर ठेवण्यात यावा, असे पत्र महापालिका आयुक्त पी. शिवशंकर यांनी सोलापूर डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन कंपनीचे कार्यकारी संचालक त्र्यंबक ढेंगळे-पाटील यांना दिले आहे.
स्मार्ट सिटी कंपनीच्या कार्यकारी संचालकपदावरुन बाजूला झाल्यानंतर आयुक्त पी. शिवशंकर स्मार्ट सिटीतील त्रुटींवर बोट ठेवत आहेत. कंपनीचे नवे कार्यकारी संचालक त्र्यंबक ढेंगळे-पाटील यांच्याशी चर्चा करुन त्यांनी पुन्हा एक पत्र दिले आहे. क्रिसील कंपनी गुणवत्तेची सेवा देत नाही. क्रिसीलचे लोक अनेकदा कामाच्या साईटवर येत नसल्याच्या तक्रारी मनपा अधिकारी करीत आहेत. कामाच्या गुणवत्तेवरही नियंत्रण नाही. क्रिसील करीत असलेली कामे मनपातील ज्युनिअर इंजिनिअरही करू शकतो.
या ज्युनिअर इंजिनिअरला आम्ही २० ते २५ हजार रुपये पगार देतोय. दुसरीकडे क्रिसीलसारख्या कंपनीला दरमहा लाखो रुपये मोजावे लागत आहेत. एसजीएसच्या सेवेवरही प्रश्नचिन्ह आहे. सर्वच कंपन्यांना कामाच्या पूर्णत्वानुसार पैसे द्या. काम होवो अथवा न होवो या कंपन्यांना पैसे दिलेच पाहिजेत, या अटी व शर्तीवर फेरविचार करा. यातून स्मार्ट सिटीचे कोट्यवधी रुपये वाचतील, अशा आशयाचे मत मांडले आहे. ढेंगळे-पाटील यांनीही ‘लोकमत’ला या पत्राबद्दल दुजोरा दिला.
यादरम्यान, तिन्ही तांत्रिक सल्लागार कंपन्यांच्या अधिकाºयांनी आयुक्त पी. शिवशंकर यांच्यासोबत चर्चा केली. आम्ही आवश्यक ती कामे नियमितपणे पूर्ण करीत आहोत. करारानुसार आता पैसे दिलेच पाहिजेत, अन्यथा आम्हाला इतर मार्ग मोकळे असल्याचा इशाराही दिला आहे.
फाईल सापडत कशी नाही?
सोलापूर डेव्हलपमेंट कंपनीने 'क्रिसील'सोबत चार वर्षांपूर्वी करार केला. हा करार करण्यापूर्वी कंपनीच्या संचालकांनी क्रिसीलवर कामाची जबाबदारी निश्चित करण्यासाठी इतिवृत्तांत तयार केला होता. ही फाईल अजूनही मिळत नाही. फाईल गायबच कशी होते, असा सवालही पी. शिवशंकर यांनी उपस्थित केला आहे.
यापूर्वीही क्रिसीलला हटवण्याचे प्रयत्न
क्रिसील कंपनीला हटविण्याचा प्रयत्न यापूर्वीचे सीईओ डॉ. अविनाश ढाकणे, दीपक तावरे यांच्या काळात काही लोकांनी केला होता. महापालिकेतील अनेक अधिकाºयांनी क्रिसीलचे काम समाधानकारक नाही. या कंपनीला विनाकारण लाखो रुपये दिले जात आहेत. मनपा अधिकाºयांनी या कंपनीच्या प्रतिनिधींना खडसावले होते. परंतु, मुंबईस्थित अधिकाºयांच्या दबावामुळे हे थांबल्याची चर्चा आहे. पी. शिवशंकर यांनी मात्र नगरविकास खात्याकडे तक्रार केली आहे.