प्रश्न पडण्याचाच प्रश्न...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 28, 2018 02:58 PM2018-12-28T14:58:17+5:302018-12-28T15:03:14+5:30

खरंतर माणसाचं आयुष्य अवघं अनेक प्रश्नाचं भांडार आहे. जन्मापासून मरणापर्यंत खूप प्रश्न आहेत. त्यांची उत्तरं शोधण्याचा प्रयत्न करता करता ...

Questions to ask questions ... | प्रश्न पडण्याचाच प्रश्न...

प्रश्न पडण्याचाच प्रश्न...

Next
ठळक मुद्देसोलापुरातील महानगरपालिका शाळा व विविध आश्रमशाळांतील जीवनात अनेक समस्या जन्मापासून मरणापर्यंत खूप प्रश्न आहेत, त्यांची उत्तरं शोधण्याचा प्रयत्न हल्ली मुलं मोबाईल, टी.व्ही. व्हिडीओ गेम, चॅटिंग कार्टूनमध्ये हरवलीत वगैरे वगैरे शेरे मारुन मोकळे होतो

खरंतर माणसाचं आयुष्य अवघं अनेक प्रश्नाचं भांडार आहे. जन्मापासून मरणापर्यंत खूप प्रश्न आहेत. त्यांची उत्तरं शोधण्याचा प्रयत्न करता करता नाकीनऊ येतात. काही प्रश्न सोडून दिल्याने सुटतात तर काही सोडवण्यावाचून पर्याय नसतो, तर काही प्रश्न नवीन असंख्य प्रश्न निर्माण करून सुटतात. काही प्रश्न ऊर्जा व प्रेरणादायी, संशोधन कार्यास प्रेरणा देतात.

आपण आज जे भौतिक साधनसुचितांचे लाभ घेत आहोत त्याचे शोध त्यावेळी कुणाला तरी पडलेल्या प्रश्नांची उकल निष्कर्ष आहे, हे आवर्जून लक्षात घ्यावे लागेल. शिक्षणातून नवनवीन क्षितिजं कवेत घेताना मुलांमधील जिज्ञासा जागृत करणं अवघ्या व्यवस्थेचं कर्तव्य आहे.आमची शिक्षणपद्धती मुळात प्रश्नोत्तरावर अवलंबून आहे पण ती साचेबद्ध रेडिमेड इतकी की गाईडमधील उत्तर जसेच्या तसे लिहिले तरंच मार्क देणारे गुरुजी आहेत.

हल्ली मुलं विचार करत नाहीत फार चंचल आहेत. एका जागी बसत नाहीत. आमचं बालपण असं होतं,आम्ही असं शिकलो, किती अडचणी होत्या, कसले प्रश्न होते परिस्थितीचे तरीही आम्ही शिकलो. अगदी बरोबर आहे. समस्या होत्या, अडचणी होत्या म्हणून उत्तरं शोधण्याची गरज पडली आणि आपण त्यातून अनुभवातून शिकलो पण तेच आम्ही काय घोडचूक करत आहोत. याची आपल्यालाच कल्पना नाही.

हल्ली मुलं मोबाईल, टी.व्ही. व्हिडीओ गेम, चॅटिंग कार्टूनमध्ये हरवलीत वगैरे वगैरे शेरे मारुन मोकळे होतो. मुलांना खेळाला मैदाने आहेत ? घरात खरंच सुसंवाद किती होतो? आज किती शाळांचं वातावरण शिकण्याची गरज वा जिज्ञासा निर्माण होऊ शकेल असं आहे ? ज्या काही स्पर्धा होतात तिथं निकालाचं पावित्र्य असो की उत्तम खेळाडूची निवड करतानाचा प्रामाणिकपणा जोपासला जातो? या साºया प्रश्नांची उत्तरं अंतर्मुख होऊन शोधावी लागतील.आपण आणखी एक नेहमी  हल्ली मुलांना प्रश्नच पडत नाहीत असे म्हणतो. मुलं विचारच करत नाहीत असं बरंच काही म्हणतो पण हे अर्धसत्य आहे.

परवाच एका निवासी विद्यार्थी व्यक्तिमत्त्व विकास शिबिरात शास्त्रज्ञ कसे घडतात? यावर मुलांशी संवाद साधताना फार छान अनुभव आला. माझ्यासमोर १७५ मुलं-मुली. त्यांच्याशी बोलता झालो. पूर्वी राजाला हवा द्यायची म्हटलं तर दोन माणसं लागायची आता बटणं थांबलं की आला वारा. किती सहज मिळतं सारं. चला आपणही जसा न्यूटनला प्रश्न पडला तसेच काही प्रश्न आपल्याला पडतात का ते पाहू या. पाच-सात मिनिटं त्यांना ध्यानमुद्रेत मौन अवस्थेत बसवलं व विचाराला प्रेरणा दिली. सारं वातावरण प्रसन्न ती निरागस मुलं साºया चित्तशक्ती एकवटून विचार करू लागली, विरामानंतर अनेकांना काही गवसल्याचा आनंद होता.अनेकांचे हात वर होते. काय विचार केला असेल? काय प्रश्न विचारतील ही मुलं असे प्रश्न माझ्यासह संयोजकांनाही पडले.

एकेक मुलं उठून विचारत होती. पहा मुलांनी किती विचार केला ते,आपण ऊस आडवा लावतो पण तो उभा का उगवतो? पतंग कीटक दिव्यावर झेप घेऊन का मरतो ? वटवाघूळ रात्रीच का घडतं ? पृथ्वीला पृथ्वी हे नाव कसं पडलं ? मोबाईल मध्ये कोणतं यंत्र आहे हे सारं आपण सहज वापरतो ? आपण आईला अरेतुरे व वडिलांना अहोजाहो का बोलतो ? असं का ? असे एक दोन नाही तर एवढ्या कमी वेळात तीस प्रश्न मुलांना पडले ? आणि ही मुलं कुठल्या हाय प्रोफाईल स्कूलची नव्हती तर उत्तर सोलापूर तालुक्यातील नंदूर, कवठे,तेलगाव, डोणगाव, बाणेगाव, प्रतापनगर, शिवणी, पाकणी,  सोलापुरातील महानगरपालिका शाळा व विविध आश्रमशाळांतील जीवनात अनेक समस्या पाठीशी बांधून शिक्षण घेण्याचा प्रयत्न करणारी ग्रामीण भागातील होती. अशा प्रश्नांची उत्तरे शोधणं म्हणजेच संशोधक होणं. नाही का ? म्हणून आज थोडं पालकांनी मुलांना घडवताना त्यांना सगळंच तुम्ही रेडिमेड देऊ नका.  त्यांना बाहेरचं जग पाहू दे ,माणसातील माणसं अनुभवू द्या. थोडंसं मानवतेच्या दृष्टिकोनातून जगाकडे पाहायची दृष्टी लाभली की मुलांना टक्केवारीच्या जोखडातून थोडं मुक्त करुन तर पहा तुमच्या पुढचेही अनेक प्रश्न विनासायास मिटतील. चला तर मग पाहू या एक प्रयत्न करून...
- रवींद्र देशमुख
(लेखक शिक्षक आणि शिक्षण क्षेत्रातील अभ्यासक आहेत)

Web Title: Questions to ask questions ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.