सोलापूर : भारताची वायुसेना सशक्त व्हावी हा हेतू डोळ्यांसमोर ठेवून एनडीए सरकारने फ्रान्स सरकारशी संपर्क साधून डेसॉल्ट कंपनीसोबत ३६ राफेल विमान खरेदी करण्याचा करार केला आहे, असे भारतीय जनता पार्टीच्या प्रवक्त्या श्वेता शालिनी यांनी पत्रकार परिषदेमध्ये स्पष्ट केले.
वास्तविक पाहता हा निर्णय काँग्रेसच्या काळात २00१ साली झाला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी याची गरज ओळखून करार पूर्ण केला आहे़ केवळ मात्र निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून,असे काँग्रेसचे राहुल गांधी हे सरकारवर खोटे आरोप करीत आहेत, त्यांनी देशाची माफी मागावी, असे मत त्यांनी पत्रकार परिषदेमध्ये व्यक्त केले.
सोलापूर श्रमिक पत्रकार संघात आयोजित करण्यात आलेल्या वार्तालापाप्रसंगी राफेल कराराबद्दल श्वेता शालिनी बोलत होत्या. यावेळी महापौर शोभाताई बनशेट्टी, भाजपचे शहराध्यक्ष प्रा. अशोक निंबर्गी, हेमंत पिंगळे आदी उपस्थित होते. यावेळी बोलताना श्वेता शालिनी म्हणाल्या की, २00१ मध्ये जेव्हा भारताचे कारगील युद्ध झाले तेव्हा पाकिस्तानचे सैन्य उंचावरून शस्त्राचा मारा करीत होते. तेव्हा भारतीय सैन्य पाकिस्तानला उत्तर देण्यासाठी कमी पडत होते. युद्धानंतर वायुसेनेने ही बाब तत्कालीन युपीएच्या सरकारसमोर मांडली. तेव्हा तत्कालीन काँग्रेसच्या युपीए सरकारने राफेल जेट विमानाचा करार केला होता. असे असताना काँग्रेसच्या युपीए सरकारने २0१२ पर्यंत कोणतीही भूमिका घेतली नव्हती, असा आरोप श्वेता शालिनी यांनी केला.
नरेंद्र मोदी हे देशाचे पंतप्रधान झाल्यानंतर त्यांनी थेट फ्रान्स सरकारशी संपर्क साधून हा राहिलेला करार पूर्ण केला, यामध्ये कोणाचीही मध्यस्थी केली नाही. आजवर केवळ दलाली मिळवत आलेल्या काँग्रेसने एकापेक्षा एक खोटे आरोप करण्यास सुरूवात केली आहे. सर्वोच्च न्यायालयातदेखील ही गोष्ट सिद्ध झाली आहे.
राहुल गांधी यांच्याकडे सध्या विरोधाचा मुद्दा नाही. ते देशाचे शत्रू असलेल्या पाकिस्तान व चीनशी जवळीकता साधत आहेत. राफेलबद्दल आरोप करून राहुल गांधी यांनी देशाच्या लष्कराचा आणि प्रत्येक कर्मचाºयाचा अपमान केला आहे. वायुसेना सशक्त होऊ नये हा त्यांचा उद्देश असल्याचेही यावेळी श्वेता शालिनी यांनी सांगितले.
देशाचे चौकीदार प्रामाणिक- नरेंद्र मोदी यांनी आजवर केलेले काम आणि भारताचे पाहिलेले भविष्य लक्षात घेता त्यांनी कोणतेही गैरकृत्य केले नाही. त्यांनी प्रामाणिकपणे देशसेवा केली आहे. याची पोहोचपावती म्हणून आगामी काळात पुन्हा नरेंद्र मोदी हेच देशाचे पंतप्रधान असतील, असा विश्वासही यावेळी श्वेता शालिनी यांनी व्यक्त केला.