आप्पासाहेब पाटील
सोलापूर : मागील वर्षभरात मध्य रेल्वेच्यासोलापूर विभागात रेल्वेच्या झालेल्या २३४ अपघातात २२१ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून, १३ प्रवासी जखमी झाल्याची माहिती रेल्वे प्रशासनाने दिली. अपघातातील बेवारस मृतांना शोधण्यासाठी रेल्वे पोलीस सोशल, प्रिंट अन् ऑनलाइन मीडियाचा आधार घेत आहेत. एवढे करूनही नातेवाईक न आलेल्या मृतांवर रेल्वे पोलीस महापालिका अथवा संबंधित नगरपालिकेच्या मदतीने अंत्यसंस्कार करण्याचे काम करीत आहेत.
देशभरात रेल्वेचे जाळे मोठ्या प्रमाणात पसरले आहे. त्यामुळे या कोपऱ्यातून त्या कोपऱ्यात जाण्यासाठी लोक रेल्वेचा आधार घेत आहेत. मागील काही वर्षात रेल्वेने प्रवास करणाऱ्यांची संख्या वाढली आहे. रेल्वेत चढताना अथवा रूळावरून डबे घसरल्याने झालेल्या अपघातात अनेक प्रवाशांना आपला जीव गमवावा लागतो. अपघातानंतर काही प्रवाशांची ओळख पटते तर काही प्रवाशांची ओळख लवकर पटत नाही. त्यामुळे रेल्वे पोलीस संबंधित मृत व्यक्तीचे शवविच्छेदन करून नातेवाइकांच्या प्रतीक्षेसाठी चार ते पाच दिवस ते मृत शरीर शवागारात ठेवले जाते. मात्र पाच दिवसानंतरही त्या मृत व्यक्तीचे नातेवाईक न आल्यास संबंधित मृतांवर महापालिका, नगरपालिका प्रशासनाच्या मदतीने रेल्वेचे लोहमार्ग पोलीसच अंत्यसंस्कार करीत असल्याचे सांगण्यात आले.
-----------
मागील वर्षातील अहवाल
- जानेवारी - २६ - १
- फेब्रुवारी - २९ - ५
- मार्च - ३० - ५
- एप्रिल - ०२-००
- मे - १४ -००
- जून १५ - १
- जुलै - ११ -००
- ऑगस्ट - ११ -००
- सप्टेंबर - १८ - २
- ऑक्टोबर १६ - २
- नोव्हेंबर - २४ -००
- डिसेंबर - २६ -१
- एकूण अपघात - २३४
---------
तिकीट अन् मोबाइलवरून नातेवाईक मिळू लागले
रेल्वेच्या अपघातात अनेकांना प्राण गमवावे लागतात. त्यात अपघातानंतर मृतांची ओळख पटविणे अथवा त्यांच्या नातेवाइकांना शोधण्यासाठी विविध उपाययोजना रेल्वे पोलिसांकडून राबविल्या जातात. दरम्यान, रेल्वे तिकीट किंवा त्या मृताजवळ असलेल्या मोबाइलवरून त्यांच्या नातेवाइकांचा शोध घेणे सोपे होत असल्याचे रेल्वे पोलिसांनी सांगितले.
रेल्वे अपघातानंतर संबंधित मृत व्यक्तीचा नियमाप्रमाणे पंचनामा, शवविच्छेदन केले जाते. बेवारस मृतांवर महापालिका व नगरपालिका प्रशासनाच्या मदतीने अंत्यसंस्कार केले जातात. त्याबाबतची नोंद व अहवाल संबंधित वरिष्ठांना पाठविला जातो. बेवारस मृतांच्या नातेवाइकांना शोधण्यासाठी सोशल मीडियाचा आधार मोठा आधार ठरतो.
- श्रेयस चिंचवाडे,
सुरक्षा आयुक्त, रेल्वे सुरक्षा बल, सोलापूर विभाग,