बिनविरोध सर्व समित्यांवर राऊत गटाचं वर्चस्व
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2021 05:12 AM2021-01-08T05:12:17+5:302021-01-08T05:12:17+5:30
बार्शी : नगरपालिकेच्या विविध विषय समित्यांच्या सभापतीपदासाठी प्रत्येकी एक अर्ज आल्याने सर्व निवडी बिनविरोध झाल्या. सार्वजनिक बांधकाम सभापतिपदी रोहित ...
बार्शी : नगरपालिकेच्या विविध विषय समित्यांच्या सभापतीपदासाठी प्रत्येकी एक अर्ज आल्याने सर्व निवडी बिनविरोध झाल्या. सार्वजनिक बांधकाम सभापतिपदी रोहित लाकाळ, शिक्षण सभापतिपदी नागेश दुधाळ, आरोग्य सभापतिपदी संदेश काकडे, महिला व बालकल्याण सभापतिपदी पुष्पा वाघमारे व उपसभापतिपदी राजश्री शिंदे यांची
प्रांताधिकारी हेमंत निकम यांनी या निवडी घोषित केल्या. मुदत संपत आल्याने बार्शी नगरपालिकेच्या स्थायी समिती व विषय समित्यांच्या निवडीकरिता नगरसेवकांची विशेष सभा बोलावली गेली. समिती सभापतिपदासाठी प्रत्येकी एक अर्ज आल्याने त्या बिनविरोध झाल्या. पाचही समितीच्या सभापतिपदी सत्ताधारी राऊत गटाच्या नगरसेवकांची बिनविरोध निवड झाली. नगराध्यक्ष असिफ तांबोळी स्थायी समितीचे पदसिद्ध अध्यक्ष, तर उपनगराध्यक्ष कृष्णराज बारबोले हे नियोजन आणि विकास समितीचे पदसिद्ध अध्यक्ष आहेत. विविध सहा समित्यांचे सभापती स्थायी समितीचे पदसिद्ध सदस्य आहेत. त्यांच्यासह राऊत गटाचे नगरसेवक विजय राऊत व माजी नगराध्यक्ष तथा नगरसेवक रमेश पाटील व सोपल गटाचे विलास रेणके यांचाही स्थायीच्या १० सदस्यीय समितीत समावेश आहे.
यावेळी नगराध्यक्ष तांबोळी, माजी नगराध्यक्ष विश्वास बारबोले, माजी नगराध्यक्ष रमेश पाटील, मुख्याधिकारी अमिता दगडे-पाटील, उपनगराध्यक्ष कृष्णराज बारबोले, नगरसेवक विजय राऊत, रावसाहेब मनगिरे, नगरसेवक दीपक राऊत, पक्षनेते विजय राऊत, शरद फुरडे-पाटील उपस्थित होते.
नव्या चेहऱ्यांना संधी
स्थायी व नियोजन समितीत सभापती व नऊ सदस्य आहेत. इतर समित्यांमध्ये सभापती व १० सदस्य आहेत. ११ जणांमध्ये आठ सदस्य राऊत गटाचे, तर तीन सदस्य सोपल गटाचे आहेत. चार समित्यांसाठी राऊत गटातील नव्या चेहऱ्यांना संधी मिळाली आहे. पाणीपुरवठा सभापतिपद सलग चौथ्या वेळी संतोष बारंगुळे यांच्याकडेच आले. निवडीनंतर नूतन सभापती, उपसभापती यांचा सत्कार करण्यात आला.
सोपल गटाची अनुपस्थिती
समिती सदस्यत्वासाठी सत्ताधारी व विरोधी पक्षाच्या वतीने नामनिर्देशन दाखल करण्यात आले. विरोधी पक्षनेते नागेश अक्कलकोटे यांच्यासह सोपल गटाच्या नगरसेवकांनी विविध समित्यांसाठी नगरसेवकांचे नामनिर्देशन दाखल केले. मात्र नंतर झालेल्या विशेष सभेप्रसंगी नागेश अक्कलकोटे यांच्यासह सोपल गटाचे सर्व नगरसेवक अनुपस्थित होते.