सोलापूर : केवळ कंटेनमेंट भागातले असल्याने इतर आजारांवरील रुग्णांवर उपचार करण्यास डॉक्टरांनी नकार दिल्याने आजवर १० जणांचा (कोरोनामुळे नव्हे) मृत्यू झाला, असा आरोप करीत कुर्बान हुसेन नगरातील लोक घराबाहेर पडत डॉक्टरांच्या भूमिकेचा निषेध नोंदवला. या भागातील प्रतिबंधित क्षेत्र तातडीने हटवावे, या प्रमुख मागणीसाठी नागरिकांनी आंदोलनाचा पवित्रा घेतला.
गुरुनानक चौक परिसरातील कुर्बान हुसेन नगर येथे कोरोनाचा रुग्ण आढळला होता. यामुळे हा परिसर पूर्ण सील करण्यात आला आहे. काही किरकोळ आजारासाठी बाहेर पडावे तर खासगी दवाखाने, रुग्णालये बंद आहेत. जिथे दवाखाने आणि रुग्णालये सुरू आहेत त्या ठिकाणी उपचारासाठी गेल्यावर आधी कोरोना पॉझिटिव्ह नसल्याचा दाखला घेऊन या, त्यानंतरच उपचार करतो, अशी भूमिका हे खासगी डॉक्टर घेत होते. काहींना शासकीय रुग्णालयात जाऊन तेथे तपासणी करणे, त्यानंतर कोरोना नसल्याचा दाखला घ्यायला विलंब झाला.
दरम्यान, परिसरातील १० जणांचा हाकनाक बळी गेल्याचा आरोप करीत कुर्बान हुसेन नगरातील मंडळी सकाळी फिजिकल्स डिस्टन्सिंग पाळत आंदोलन केले. अचानक शेकडो लोक एकत्र आल्यामुळे पोलिसांनी बंदोबस्त वाढवला. दरम्यान, माजी आमदार आडम यांच्यासह माजी नगरसेविका नलिनी कलबुर्गी आणि अन्य घटनास्थळी दाखल झाले. आडम यांनी रहिवाशांची ही मागणी निवेदनाद्वारे जिल्हाधिकाºयांपर्यंत पोहोचवली. संतप्त झालेल्या नागरिकांना पोलीस निरीक्षक बजरंग साळुंखे यांच्यासह त्यांच्या टीमने शांत केले.
परिसरात रुग्णसेवा मिळावी- या भागातील लोक बाहेर जाऊ नयेत, यासाठी सहायक पोलीस निरीक्षक नंदकिशोर सोळंखे यांनी रेशन दुकानदार यांना विनंती करून धान्य उपलब्ध करून देण्याची व्यवस्था केली. मात्र, किरकोळ आजारासाठी परिसरात एका डॉक्टरची नियुक्ती करावी, अशी मागणी अल्लाबक्ष शेख यांनी केली आहे.
दोन दिवसांपूर्वी सासºयांना छातीत दु:खू लागल्याने त्यांना एका खासगी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी घेऊन गेले असता, त्यांनी प्रतिबंधित क्षेत्रातील तुम्ही आहात, असे सांगत उपचार करण्यास नकार दिला. यामुळे त्यांना दुसºया रुग्णालयात घेऊन जावे लागले. तेथे तात्पुरती औषधे देण्यात आली. मात्र, योग्य उपचार न मिळाल्याने त्यांचा जीव गेला. - बाबा शेख, परिसरातील नागरिक
प्रतिबंधित क्षेत्रातील नागरिकांना सर्व सुविधा मिळाव्यात. प्रशासनाच्या काही त्रुटींमुळे नागरिकांची अडचण होत आहे. यासाठी प्रशासनाने नागरिकांसाठी मधुमेह, कर्करोग, रक्तदाब तसेच गंभीर व दुर्धर आजार जडलेल्या रुग्णांना प्राधान्याने सेवा मिळावी, याकडे त्यांनी लक्ष द्यावे.- नरसय्या आडम, माजी आमदार
कुर्बान हुसेन झोपडपट्टी संदर्भात तक्रारी मला मिळाल्या होत्या यासाठी मी तिथे भेट दिली. तेथील नागरिकांच्या मागणीमुळे तिथे फिवर ओपीडी सुरू करण्यात येत आहे. त्यांच्या अडचणीविषयी संबंधित अधिकाºयांना सूचना दिल्या आहेत, हे प्रश्न आपण लवकरच मार्गी लावणार आहोत.- दीपक तावरे, मनपा आयुक्त