सोलापूर : अवसायक नेमलेल्या जिल्ह्यातील १२८ सहकारी संस्थांची नोंदणी रद्द करण्यात आली आहे. अवसायनातील ४४४ संस्थांची नोंदणी रद्द करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे जिल्हा उपनिबंधक अविनाश देशमुख यांनी सांगितले.
पिशवीतील सहकारी संस्थांची नोंदणी कायमची रद्द करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला होता. त्यानुसार जिल्ह्यातील कायमस्वरुपी बंद असलेल्या व ठावठिकाणा नसलेल्या संस्थांची नोंदणी रद्द केली आहे. यापैकीच मागील १० वर्षांपेक्षा अधिक व त्यापेक्षा कमी कालावधीपासून ५७२ सहकारी संस्थांवर अवसायक नेमले आहेत. अशा संस्थांची नोंदणीही रद्द करण्याचे आदेश जिल्हा उपनिबंधक अविनाश देशमुख यांनी दिले होते.
तालुका पातळीवरील व जिल्हा पातळीवरील या संस्थांची नोंदणी रद्द करण्याची कारवाई सुरू आहे. १० वर्षांपेक्षा अधिक कालावधी झालेल्या ४४ पैकी ४२ संस्थांची नोंदणी रद्द करण्यात आली आहे. ६ वर्षांपर्यंतच्या कालावधीत अवसायक असलेल्या ७५ संस्थांची नोंदणी रद्द करण्यात आली आहे. अशा एकूण १२८ संस्थांची नोंदणी रद्द केली असून ४४४ सहकारी संस्थांची नोंदणी रद्द करण्याची कार्यवाही सुरू आहे.
तपासणी करून कारवाई- कायमस्वरुपी बंद असलेल्या व केवळ कागदावर आकडेमोड करण्यासाठी संस्था सुरू ठेवल्या जात नाहीत. अशा संस्थांची तपासणी करून अवसायक नेमण्याची तत्काळ कारवाई केली जात आहे.