राजकारणाची सूत्रे आता युवा ब्रिगेडच्या हाती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 4, 2021 04:41 AM2021-03-04T04:41:51+5:302021-03-04T04:41:51+5:30
आ. भारत भालके यांच्या निधनानंतर त्यांचे पुत्र भगिरथ भालके यांनी विठ्ठल कारखान्याच्या अध्यक्षपदाची जबाबदारी घेत असताना पंढरपूर-मंगळवेढ्याच्या ग्रामपंचायत निवडणुकीत ...
आ. भारत भालके यांच्या निधनानंतर त्यांचे पुत्र भगिरथ भालके यांनी विठ्ठल कारखान्याच्या अध्यक्षपदाची जबाबदारी घेत असताना पंढरपूर-मंगळवेढ्याच्या ग्रामपंचायत निवडणुकीत अनेक गावांतील वाद-विवाद सोडविण्यापासून उमेदवार निश्चित करण्यापर्यंत महत्त्वाची भूमिका बजावली. शिवाय जास्तीत जास्त ग्रामपंचायती, ग्रामपंचायत सदस्य आपल्या गटाचे निवडून येण्यासाठी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. येणाऱ्या पोटनिवडणुकीत आपणच उमेदवार, असे गृहीत धरून त्यांनी दोन्ही तालुक्यांतील शहरांसह ग्रामीण भाग पिंजून काढला आहे.
कै. माजी आ. सुधाकर परिचारक यांचे नातू प्रणव परिचारक हे परिचारक हयात असल्यापासून राजकारणात सक्रिय होते. मात्र, त्यांच्याकडे फारशा मोठ्या जबाबदाऱ्या नसायच्या. मात्र, सुधाकरपंत परिचारकांच्या निधनानंतर काका आ. प्रशांत परिचारक व उमेश परिचारक यांना त्यांचे मोठे पाठबळ मिळत असून, ग्रा. पं. निवडणुकीत त्यांनी युवकांच्या माध्यमातून मोठे यश मिळविले आहे. शिवाय खर्डी ग्रामपंचायतीची सत्ता एकहाती राखत आपण मोठी जबाबदारी घेण्यास तयार असल्याची चुणूक दाखविली आहे.
राष्ट्रवादीचे दिवंगत कार्याध्यक्ष राजूबापू पाटील यांचे करकंब, मेंढापूर, गुरसाळे गटात मोठे राजकीय साम्राज्य होते. त्यांच्या निधनानंतर त्यांचे पुत्र राष्ट्रवादी युवकचे जिल्हाध्यक्ष गणेश पाटील यांनी माढा मतदारसंघातील सर्वात मोठी ग्रामपंचायत म्हणून परिचित असलेल्या भोसे ग्रामपंचायतीत विरोधकांची सर्व गणिते मोडीत काढत सर्वच्या सर्व जागा जिंकत एकहाती सत्ता स्थापन केली आहे. इतर गावांतही त्यांनी आपल्या समर्थकांना निवडून आणण्यात महत्त्वाचा वाटा उचलला आहे. शिवाय येणाऱ्या विठ्ठल कारखाना, झेडपी, पंचायत समिती निवडणुकींसाठी स्व. यशवंतभाऊ पाटील, राजूबापू पाटील यांच्याप्रमाणे ज्येष्ठ, तरुणांची मोट बांधण्यास सुरुवात केली आहे.
सहकार शिरोमणीचे अध्यक्ष कल्याणराव काळे यांचे बंधू समाधान काळे गेल्या काही वर्षांपासून राजकारणात सक्रिय आहेत. सीताराम कारखान्याच्या कार्यकारी संचालकपदाची जबाबदारी सांभाळत असताना वाडीकुरोलीचे सरपंचपद त्यांनी यशस्वीपणे भूषविले आहे. यावेळी त्यांनी जिल्हा पातळीवर नसणाऱ्या अनेक योजना वाडीकुरोली गावात राबवून तरुण सरपंचांसमोर नवीन आदर्श निर्माण केला होता. युवा गर्जना संघटनेच्या माध्यमातून तालुक्याच्या राजकारणात त्यांना मानणारा मोठा वर्ग आहे. ग्रामपंचायत निवडणुकीत त्यांनी अनेक युवकांना पाठबळ देत निवडून आणत येणारा काळ हा तरुणांचा असल्याचे सिद्ध केले आहे. राष्ट्रवादीचे माजी तालुकाध्यक्ष दीपक पवार यांनी त्यांचे वडील विठ्ठल व सहकार शिरोणीचे माजी संचालक दामोदर पवार यांच्यानंतर जैनवाडीचे दहा वर्षे सरपंचपद, पं.स. सदस्यपद सांभाळत असताना पडत्या काळात राष्ट्रवादीसारख्या पक्षाला पंढरपूर तालुक्यात उभारी देण्याचे काम केले आहे. चार वर्षे राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्षपद यशस्वीपणे सांभाळले आहे. शिवाय पंढरपूर तालुक्यातील ७२ ग्रामपंचायतींपैकी एकमेव जैनवाडी ग्रामपंचायत त्यांच्याच नेतृत्वात बिनविरोध करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे.
डीव्हीपी उद्योग समूहाचे अध्यक्ष अभिजीत पाटील यांनी तीन सहकारी साखर कारखान्यांची निर्मिती करून ते यशस्वीपणे चालवून दाखविण्याची किमया केली आहे. येणाऱ्या साखर कारखान्याच्या निवडणुकीत त्यांनी मोर्चेबांधणी करत तालुक्याच्या ग्रामीण भागात कार्यकर्त्यांचे मोठे जाळे निर्माण केले आहे. डीव्हीपी उद्योग समूहाच्या माध्यमातून अनेक तरुणांना रोजगार उपलब्ध करून दिला आहे. तरुणांमध्ये सध्या त्यांची मोठी क्रेझ असल्याचे चित्र आहे.
ज्येष्ठांची उणीव भरून निघणार
गेल्या २५ ते ३० वर्षांपासून पंढरपूर तालुक्याच्या राजकारणात कै. सुधाकरपंत परिचारक, कै. भारत भालके, कै. यशवंतभाऊ पाटील, कै. राजूबापू पाटील यांनी राजकारणाची धुरा यशस्वीपणे सांभाळली होती. मात्र, त्यांच्या आकस्मित निधनानंतर तालुक्याच्या राजकारणात झालेली पोकळी त्यांचे वारसदार व नव्याने निर्माण झालेले तालुक्यातील नेतृत्व ती जबाबदारी ग्रामपंचायत निवडणुकीच्या माध्यमातून सांभाळण्यासाठी सक्षम असल्याचे सिद्ध झाले आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात त्यांची उणीव भरून निघणार असल्याचे बोलले जात आहे.
फोटो :::::::::::::
भगिरथ भालके, गणेश पाटील, समाधान काळे, दीपक पवार, अभिजीत पाटील, प्रणव परिचारक