रणरणत्या उन्हात दिलासा; ‘ठंडा ठंडा कुल कुल’ रिक्षाला सुगंध वाळ्याचा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 9, 2019 02:47 PM2019-04-09T14:47:34+5:302019-04-09T14:51:33+5:30
कडक उन्हात थंडगार कुलरच्या हवेची अनुभूती देत प्रवास ‘ठंडा ठंडा कुल कुल’ अशीच सफर सध्या सोलापुरकरांना अनुभवायला मिळत आहे़
यशवंत सादूल
सोलापूर : कडक उन्हात थंडगार कुलरच्या हवेची अनुभूती देत प्रवास ‘ठंडा ठंडा कुल कुल’ अशीच सफर अनुभवायला मिळते ते सुरेश कोरहळ्ळी यांच्या रिक्षात बसल्यावर. रिक्षाच्या उजव्या बाजूला वाळ्याचे पडदे बांधले असून त्यावर वारंवार पाणी शिंपडले जाते. रिक्षा वेगाने पुढे चालली की थंडगार हवा प्रवाशांना मिळते. वातानुकूलित प्रवासाचा अनुभव मिळतो.
पूर्वाश्रमीचे भाजी विक्रेते असलेले सुरेश कोरहळ्ळी यांनी १९८७ पासून रिक्षा चालविण्याचा व्यवसाय पत्करला. सुरुवातीला हरिभाई, सिद्धेश्वर प्रशालेच्या विद्यार्थ्यांना वाहतूक सेवा देत असत, पुढे वालचंद कॉलेजच्या विद्यार्थ्यांसाठी सेवा सुरू केली.
इतर वेळेत मात्र ते सर्वसामान्य प्रवाशांकरिता वाहतूक सेवा देतात. सुरेश कोरहळ्ळी यांना दोन मुले असून एक कॉम्प्युटर आॅपरेटर आहे तर दुसरा मुलगा हॉटेल व्यवसायात आहे तर मुलगी कॉम्प्युटर डिप्लोमाधारक आहे. प्रवाशांसोबत सगळ्यांच्या सोयीसाठी रिक्षात फिरत्या पाणपोईची व्यवस्था करण्यात आली आहे. प्रवाशांना थंडगार पाणी तर मिळतेच ज्या ठिकाणी रिक्षा थांबून राहते तेथील तहानलेल्या सर्वांनाही पाणी दिले जाते. वरदी व्यतिरिक्त वालचंद कॉलेज व जिल्हा परिषद या ठिकाणी कायम ही रिक्षा आपली सेवा देण्यासाठी उभी असते.
दररोज २५ ते ३० विद्यार्थी व ३५ ते ४० प्रवाशांची ने आण करण्यासोबत अंध,अपंग, गरोदर,निराधार महिलांना मोफत सेवा देतात. रिक्षाच्या पाठीमागील बाजूस पाण्याची टाकी ठेवली असून ज्या ठिकाणी प्रवाशांना सोडतो त्या ठिकाणी लगेच वाळ्याच्या पडद्यावर पाणी मारले जाते,पुढचा प्रवास सुरु होतो, सकाळी ७ ते रात्री उशिरापर्यंत प्रवाशांच्या मागणीप्रमाणे सेवा देतात. रिक्षाचालकाच्या या उपक्रमाचे प्रवाशांमधून जोरदार स्वागत होत आहे. इतर रिक्षाचालकांनीही उन्हाळा संपेपर्यंत ही पद्धत सुरु करावी, असा सूर ऐकावयास मिळत आहे.
मतदान जनजागृतीसाठी...
- जसा उन्हाचा कडाका वाढला तसा गेल्या महिना दीड महिन्यापासून ठंडा कुल प्रवासाची सोय केलेल्या सुरेश कोरहळ्ळी यांनी रिक्षाच्या दोन्ही बाजूस लोकसभेच्या पार्श्वभूमीवर लोकशाहीसाठी मतदानाचा हक्क बजविण्याचे आवाहनही केले आहे. असह्य होणारे उन्हाचे चटके आणि गरम हवा प्रवाशांना लागू नये आणि प्रवास सुखकारक व्हावा या उद्देशाने यंदा प्रथमच वाळ्यांचे पडदे रिक्षास बांधले आहेत. प्रवासी माझ्या रिक्षात बसण्यास पहिली पसंती दाखवितात. गेल्या महिनाभरापासून अनेक प्रवाशांसह पुण्याहून इंटरसिटीने येणारे प्रवासी मोबाईल नंबर घेऊन वर्दी देत असल्याचे रिक्षाचालका सुरेश कोरहळ्ळी यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.