आषाढी वारीला वारकरी संप्रदायात खूप महत्त्व आहे. यावर्षीची परिस्थिती लक्षात घेता दारूची दुकाने, डान्सबार, वाहतूक, लग्नसोहळे, राजकीय कार्यक्रम राजरोसपणे सुरू आहेत. मग धार्मिक कार्यक्रमांनाच बंदी का? अशी भूमिका घेऊन संतवीर बंडातात्या कराडकर यांनी सरकारच्या सर्व नियमांसह आषाढी पायी वारी करण्यास परवानगी मिळावी, म्हणून सरकारकडे वारंवार विनंती केली.
परंतु या मागणीची सरकारने दखल न घेतल्याने ह.भ.प. बंडातात्या कराडकर यांनी वारकऱ्यांना पायी चालण्याचे आवाहन केले. त्यामुळे पोलिसांनी त्यांना ३ जुलैला पहाटे ताब्यात घेऊन पहाटे करवडी (ता. कराड) येथे गोशाळेवर नजरकैदेत ठेवले आहे.
त्यामुळे त्यांना अतिशय हिन व अपमानास्पद वागणूक देणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांवर कारवाई व्हावी व बंडातात्या कराडकर यांना नजरकैदेतून मुक्त करावे, अन्यथा मोठ्या प्रमाणात आंदोलन केले जाईल, असा इशारा ह.भ.प. ज्ञानेश्वर महाराज हेटकळे यांनी निवेदनाद्वारे दिला आहे.
यावेळी ह.भ.प. सयाजी महाराज गेंड, ह.भ.प. रामचंद्र महाराज चव्हाण, व्यसन मुक्तीचे अध्यक्ष मोहन जाधव, भारत मलमर, तानाजी येडगे, ग्रा.पं. सदस्य संजय पाटील, पप्पु बंडगर, आदी वारकरी बांधव उपस्थित होते.