करमाळ्यात रेमडेसिविर इंजेक्शनचा कोटा वाढवून मिळणार : शिंदे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 1, 2021 04:20 AM2021-05-01T04:20:27+5:302021-05-01T04:20:27+5:30
तालुक्यामध्ये यापूर्वी उपजिल्हा रुग्णालय, शहा हॉस्पिटल व पवार हॉस्पिटल या तीनच हॉस्पिटलला अधिकृत कोविड केअर सेंटर म्हणून मान्यता मिळालेली ...
तालुक्यामध्ये यापूर्वी उपजिल्हा रुग्णालय, शहा हॉस्पिटल व पवार हॉस्पिटल या तीनच हॉस्पिटलला अधिकृत कोविड केअर सेंटर म्हणून मान्यता मिळालेली होती. त्यामुळे या तीन ठिकाणी असणाऱ्या रुग्णांच्या संख्येनुसार तालुक्याला अत्यल्प स्वरूपामध्ये इंजेक्शन उपलब्ध होत होते.
नव्याने अधिकृत सेंटरच्या मान्यतेचा प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयाकडे दिले होते. त्यानुसार शहरातील लोकरे हॉस्पिटल, शेलार हॉस्पिटल व ग्रामीण रुग्णालय जेऊर या तीन ठिकाणी नव्याने कोविड केअर सेंटरला अधिकृत मान्यता मिळाली आहे. त्यामुळे करमाळा तालुक्यासाठी इंजेक्शनचा कोटा वाढवून मिळणार आहे. याबाबत जिल्हाधिकारी कार्यालय, प्रांत कार्यालयाशी बोलणे झाल्याची माहिती आ. संजयमामा शिंदे यांनी दिली.
रुग्णवाहिका कोरोना रुग्णांसाठी उपयोगात आणणार
आमदार स्थानिक विकास निधीमधून मतदारसंघासाठी आपण दोन रुग्णवाहिका दिलेल्या आहेत. त्यापैकी एक कुर्डूवाडी व दुसरी करमाळा उपजिल्हा रुग्णालयाला दिलेली आहे. या रुग्णवाहिकेसाठी ऑक्सिजनचे किट बसवणे बाकी असल्यामुळे ती रुग्णवाहिका कोरोना रुग्णांसाठी वापरात आणली जात नव्हती. दोन दिवसात तात्पुरत्या स्वरूपात सिलिंडरचा उपयोग करून ऑक्सिजनची सोय या रुग्णवाहिकेमध्ये केली जाणार आहे. त्यामुळे करमाळा उपजिल्हा रुग्णालयाला दिलेली रुग्णवाहिका लवकरच कोरोना रुग्णांसाठी उपयोगात आणली जाणार आहे, अशी माहिती आ. संजयमामा शिंदे यांनी दिली.
----