संकल्प नववर्षाचा ; दुहेरी पाईपलाईन, स्मार्ट सिटीची कामे करणार : अविनाश ढाकणे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 29, 2018 12:05 PM2018-12-29T12:05:02+5:302018-12-29T12:06:20+5:30
सोलापूर : आगामी वर्षात दुहेरी पाईप लाईनचे काम पूर्ण करणार शिवाय स्मार्ट सिटी योजनेतील कामे आणि एलईडी, स्मार्ट क्लास ...
सोलापूर : आगामी वर्षात दुहेरी पाईप लाईनचे काम पूर्ण करणार शिवाय स्मार्ट सिटी योजनेतील कामे आणि एलईडी, स्मार्ट क्लास रूमची योजनाही पूर्णत्त्वास नेणार असल्याचा संकल्प महापालिकेचे आयुक्त डॉ. अविनाश ढाकणे यांनी व्यक्त केला.
डॉ. ढाकणे म्हणाले, मी अशी कृती करतो की ज्यातून मला समाधान मिळायला हवे आणि लोकसेवक म्हणून समाजाला त्याचा फायदा व्हायला हवा. एखाद्या कृतीतून पश्चाताप करावा लागेल, अशी कृती मी करीत नाही. एक संपूर्ण वर्ष समोर ठेवून संकल्प करणे अवघड आहे. परंतु, मी दर महिन्याच्या एक तारखेला त्या महिन्यात प्राधान्याने करायची कामे ठरवितो.
या कामांची यादी माझ्या रुममधील बोर्डवर लिहिलेली असते. आपले प्राधान्यक्रम दररोज डोळ्यांसमोर दिसल्याने त्यावर लक्ष राहते. त्यातील अडचणी दूर करण्याच्या प्रयत्नात सातत्य राहते. ही कामे पूर्ण झाली की तो बोर्ड पुन्हा पुसून टाकतो. पुन्हा नव्या कामांची यादी तयार करतो.
स्मार्ट सिटी योजनेतील कामे अशाच पध्दतीने मार्गी लागली आहेत. सोलापूर शहरामध्ये पुढील वर्षात स्मार्ट सिटीची काही कामे पूर्ण होतील. यामध्ये एलईडी, स्मार्ट क्लासरुम, कमांड अँड कंट्रोल सेंटर आदी कामांचा समावेश असेल.
या कामांचा नियमितपणे आढावा घेत आहे. निविदा प्रक्रिया करतानाही वेळ लागतो. परंतु, पाठपुरावा राहिला की अडचणी दूर होतात. पुढील वर्षात दुहेरी पाईपलाईन, स्मार्ट सिटी एरियातील रस्त्यांची कामे, भुयारी गटार, हुतात्मा स्मृती मंदिराचे सुशोभीकरण, सात रस्ता बसडेपोचे सुशोभीकरण अशा कामांना सुरुवात होणार आहे. ही कामे पूर्ण व्हायला वेळ लागेल. पण सोलापूरच्या दृष्टीने खूपच महत्त्वाची असतील. याशिवाय नागरिकांना अधिकाधिक सुविधा पुरविण्यासाठी प्रयत्नशील राहणार आहे.