१६ ग्रामपंचायतींच्या १४४ उमेदवारांवर निवडणूक लढविण्यावर निर्बंध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 28, 2020 04:12 AM2020-12-28T04:12:40+5:302020-12-28T04:12:40+5:30
२०१५ साली तालुक्यात झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत खर्चाचा हिशोब निवडणूक कार्यालयात वेळेत सादर करणे उमेदवारास आवश्यक होते. परंतु बहुतांश ग्रामपंचायतीसाठी ...
२०१५ साली तालुक्यात झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत खर्चाचा हिशोब निवडणूक कार्यालयात वेळेत सादर करणे उमेदवारास आवश्यक होते. परंतु बहुतांश ग्रामपंचायतीसाठी उमेदवारी अर्ज दाखल केलेल्या उमेदवारांनी निवडणुकीचा खर्च वेळेत सादर केला नाही. त्यामुळे तत्कालिन जिल्हाधिकाऱ्यांनी राज्य निवडणूक आयोगाला निवडणूक खर्च सादर न केलेल्या उमेदवारांची यादी सादर केली होती. त्यावर निवडणूक आयोगाने कारवाईचा निर्णय घेत त्या उमेदवारांना पुन्हा निवडणूक लढविण्यावर बंदी घातली आहे.
सरपंचपदाचे आरक्षण पुढे ढकलल्याने ग्रामपंचायत निवडणुकीतील उत्साह कमी झाला असला तरी आगामी काळातील पोटनिवडणूक, सहकारी संस्थेची निवडणूक पाहता ग्रामपंचायतीवर आपले वर्चस्व असावे, यादृष्टीने राजकीय मोर्चेबांधणी वेगात सुरू आहे. मात्र निवडणूक आयोगाने प्रसिद्ध केलेल्या अपात्र उमेदरवारांच्या यादीमुळे गावगाड्यातील नेतेमंडळींना नवीन उमेदवार शोधण्यासाठी धावपळ करावी लागत आहे. निवडणूक आयोगाच्या या कारवाईमुळे निवडणुकीत उतरलेल्या उमेदवाराने आपल्या खर्चाचे विवरण तत्काळ देणे बंधनकारक आहे.
गावनिहाय अपात्र संख्या
मंगळवेढा तालुक्यातील लवंगी २०, बोराळे ३, घरनिकी २, भोसे १०, सलगर बु. २१, तांडोर ७, गुंजेगाव १, लमाणतांडा १४, कचरेवाडी ३, लेंडवेचिंचाळे १३, माचणूर ९, गणेशवाडी ८, आसबेवाडी ७, नंदेश्वर ४, मरवडे २२, सिद्धापूर २ अशा १४४ उमेदवारांचा निवडणूक खर्च सादर न केलेल्यांच्या यादीत समावेश आहे.