उजनीच्या पाण्याने ओढे, नाले, तलाव, बंधारे भरुन घेणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 6, 2019 08:08 PM2019-08-06T20:08:33+5:302019-08-06T20:14:53+5:30
सोलापूर लाभक्षेत्र विकास प्राधिकरणचे अधीक्षक अभियंता धीरज साळे यांचा ‘लोकमत’ शी संवाद
सोलापूर : उजनी धरण पूर्ण क्षमतेने भरण्याच्या मार्गावर असल्याने कालवा व उपसा सिंचन योजनांद्वारे जिल्ह्यातील तलाव, खोलीकरण केलेले ओढे, बंधारे भरून घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्यासाठी कालवा व दोन्ही नद्यांना पाणी सोडण्यात आले असल्याचे लाभक्षेत्र विकास प्राधिकरणचे अधीक्षक अभियंता धीरज साळे यांनी ‘लोकमत’ बोलताना सांगितले.
पुणे जिल्ह्यात पावसाची संततधार सुरू असल्याने मोठ्या प्रमाणावर पाण्याचा विसर्ग उजनी धरणात येत आहे. यामुळे उजनी धरण सोमवारी सायंकाळी ७५ टक्के भरले असून वरुन पाण्याचा प्रवाह वाढतच आहे. यामुळे उजनीचे दरवाजे उघडून भीमा नदीला पाणी सोडले आहे. याशिवाय कालवा व भीमा-सीना बोगद्यालाही पाणी सोडण्यात आले आहे.
बोगद्यातून सोडलेले पाणी सीना नदीकाठच्या शेतीसाठी उपयोगी पडणार आहे कारण जिल्ह्यात पाऊस कमी असल्याने पाण्याची गरज आहे. सीना नदीवरील बार्शी व शिरापूर या उपसा सिंचन योजनाही कार्यान्वित करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्यामुळे बार्शी व उत्तर तालुक्यातील योजनेच्या कार्यक्षेत्रातील तलावात पाणी सोडण्यास मदत होणार आहे.
कालव्यातून सोडलेले पाणी उजव्या व डाव्या कालव्याद्वारे सोलापूर शहरापर्यंत येणार आहे. धरणापासून सोलापूरपर्यंत कालव्यालगतच्या ओढ्यांना, ओढ्यावरील बंधाºयांना व तलावात पाणी सोडता येणार आहे. तसे आदेश असल्याचे अधीक्षक अभियंता धीरज साळे यांनी सांगितले. ज्या-ज्या ठिकाणी पाणी साठवता येणार आहे त्या-त्या ठिकाणी पाणी सोडण्यासाठीच्या सूचना आम्ही कर्मचाºयांना दिल्या असल्याचे साळे यांनी सांगितले.
त्या अन् याही वर्षी सारखीच स्थिती..
- २०१३ मध्ये अशाच पद्धतीने पुणे जिल्ह्यात पाऊस पडल्याने उजनी धरणात मोठ्या प्रमाणावर पाणी येत होते. त्यावर्षीही जिल्ह्यात पाऊस कमी पडल्याने उजनी धरण कालवा क्षेत्राखालील तलाव, ओढे, नाले, बंधारे पाण्याने भरुन घेतले होते. लाभक्षेत्र विकास प्राधिकरण कार्यालयाच्या अधिकारी व कर्मचाºयांनी पाण्याचे नियोजन केल्याने अनेक कोरडे तलाव पाण्याचे भरुन निघाले होते. ही परिस्थिती याही वर्षी निर्माण झाली असून उजनीमुळे मागील वर्षीही जेमतेम तलाव भरले होते.
- सीना-माढा उपसा सिंचन योजना सुरू करण्यात आली असून मंगळवारी दहिगाव उपसा सिंचन योजना सुरू करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. बार्शी व शिरापूर उपसा सिंचन योजनाही सुरू केल्या जाणार असल्याचे कार्यकारी अभियंता रमेश वाडकर यांनी सांगितले.
उजनीत पुणे जिल्ह्यातून येणारा पाण्याचा विसर्ग पाहता कालवा क्षेत्रात ज्या-ज्या ठिकाणी पाणी साठवता येईल त्या-त्या ठिकाणी पाणी साठवले जाईल. तसे नियोजन केले असून किमान महिनाभर कालवा व बोगद्याला पाणी सोडण्याचे नियोजन आहे. शेतकºयांनीही पाणी साठविण्यासाठी स्वत:हून प्रयत्न करावेत.
- धीरज साळे, अधीक्षक अभियंता, लाभक्षेत्र विकास प्राधिकरण