सोलापूर : ग्रामदैवत सिध्देश्वर महाराजांची यात्रा तोंडावर आली आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक (पार्क चौक) ते फडकुले हॉल यादरम्यान सिमेंटचा रस्ता तयार आहे. मात्र रस्त्याच्या बाजूला सेवा वाहिन्यांसाठी खोदलेले खड्डे कायम आहेत. महावितरण, स्मार्ट सिटी आणि महापालिका यांच्यात समन्वय नसल्याने हा प्रकार घडत आहे. त्याचा फटका सिध्देश्वर भक्तांना बसणार आहे.
स्मार्ट सिटी योजनेतून पंचकट्टा ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक यादरम्यानचा रस्ता स्मार्ट रोडच्या धर्तीवर तयार करण्यात येत आहे. रस्त्याच्या दोन्ही बाजूला भुयारी गटार, पावसाचे पाणी वाहून जाण्यासाठी बंदिस्त गटार, भुयारी वायरिंग अशा सेवावाहिन्या करण्यात आल्या आहेत. भुयारी गटार, पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन करण्यास बराच वेळ लागला आहे. त्यानंतर एका बाजूने काँक्रीटचा रस्ता करण्यात आला.
फडकुले हॉलच्या बाजूकडील रस्त्याचे काँक्रिटीकरण दोन दिवसांपूर्वी पूर्ण झाले आहे. या कामामुळे रस्ता दुभाजकात माती साचली आहे. धूलीकणांचा त्रास दिवसभर नागरिकांना होत असतो. काँक्रिटीकरण पूर्ण झाले असले तरी सेवा वाहिन्यांचे काम अद्याप पूर्ण झालेले नाही. त्यासाठी खोदाई करण्यात आली असून त्याची धूळ उडून रस्त्यावर येत आहे. ही प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करावीत, अशी मागणी सिध्देश्वर होत आहे.
वीज वितरण कंपनीकडून उशीर - स्मार्ट सिटी अधिकाºयांनी दिलेल्या माहितीनुसार, रस्त्याच्या बाजूला भुयारी वायरिंगचे काम करण्यात येत आहे. महावितरण कंपनीकडून या कामाला वेळेवर सुरुवात होत नाही. अधिकारी दाद देत नाहीत. त्यामुळे कामाला विलंब होतो. महावितरणमधील अधिकाºयांच्या या भूमिकेचा फटका स्मार्ट सिटी योजनेतील अनेक कामांना बसला आहे. आता गड्डा यात्रेलाही या प्रलंबित कामांचा त्रास सहन करावा लागण्याची चिन्हे आहेत.
धूळ हटविण्याच्या मूळ उद्देशाला हरताळ - रस्त्यावरील धूळ कमी व्हावी, वारंवार रस्ते खोदाई करायला लागू नये यासाठी सिमेंटचे रस्ते आणि रस्त्यांच्या बाजूला सेवा वाहिन्या टाकण्यात येत आहेत. परंतु, महापालिकेचा ड्रेनेज विभाग, स्मार्ट सिटी कंपनीच्या अधिकाºयांमध्ये समन्वय नसल्याने हे रस्ते धूळयुक्त बनले आहेत.
‘लोकमत’ ठेवणार दररोज लक्ष...- सिध्देश्वर भक्तांची यात्रा सुसह्य व्हावी यासाठी मंदिर परिसरात स्मार्ट सिटी योजनेतील कामे लवकरात लवकर पूर्ण होणे अपेक्षित आहे. त्यासाठी ‘लोकमत’ दररोज या कामांचा आढावा घेणार आहे. सर्व यंत्रणांनी तत्काळ समन्वय ठेवून ही कामे तत्काळ पूर्ण करुन घ्यावीत, असा यामागचा उद्देश आहे.
सिध्देश्वर मंदिर परिसरातील सर्व कामे वेळेवर पूर्ण करण्याचे नियोजन आहे. त्यादृष्टीने कंत्राटदारांना आदेश दिले आहेत. नियमित आढावा घेतला जात आहे. सिध्देश्वर भक्तांना कोणत्याही प्रकारचा त्रास होउ नये याची पूर्णपणे काळजी घेण्यात आली आहे. -विजय राठोड, समन्वयक, स्मार्ट सिटी कंपनी.