पोलीस असल्याचे सांगून वृद्धाला लुटले; दीड लाखांचा ऐवज पळवला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 17, 2021 04:22 AM2021-03-17T04:22:58+5:302021-03-17T04:22:58+5:30
सांगोला येथील तुकाराम गुळमिरे हे मंगळवारी सकाळी ९ च्या सुमारास घरासमोरील विनायक दौंडे यांच्या अंत्यविधीसाठी वाढेगाव रोडवरील स्मशानभूमीकडे निघाले ...
सांगोला येथील तुकाराम गुळमिरे हे मंगळवारी सकाळी ९ च्या सुमारास घरासमोरील विनायक दौंडे यांच्या अंत्यविधीसाठी वाढेगाव रोडवरील स्मशानभूमीकडे निघाले होते. रस्ता ओलांडून जाण्याच्या तयारीत असताना दुचाकीवरून आलेल्या अनोळखी इसमांनी ‘कोठे जायचे आहे, असे त्यांना विचारुन आम्ही पोलीस आहोत असे सांगून रात्री आम्ही या ठिकाणी मोठी रेड केली आहे. तुमच्याकडे काय चीजवस्तू असतील त्या तुमच्या रुमालामध्ये बांधून ठेवा, असा बहाणा केला.
यावेळी तुकाराम गुळमिरे यांनी १ लाख १२ हजार ५०० रुपये किमतीचा गळ्यातील २५ ग्रॅम सोन्याचा गोफ, ४९ हजार ५०० रूपये किमतीच्या ११ ग्रॅम खडा असलेल्या दोन सोन्याच्या अंगठ्या व मनगटी घड्याळ अशा चीजवस्तू रुमालात बांधल्या. यावेळी त्या दोघांनी हातचलाखी करून चीजवस्तू काढून घेऊन घड्याळ बांधलेला रुमाल त्यांच्याकडे परत करून तेथून निघून गेले. घडल्या प्रकारानंतर तुकाराम गुळमिरे यांनी अंत्यविधीला न जाता घराकडे परतले. त्यांना रुमालातील चीजवस्तू त्या दोघांनी काढून घेवून फसवणूक केल्याचे लक्षात आले. याबाबत तुकाराम श्रावण गुळमिरे यांनी अज्ञात दोन अनोळखी इसमाविरुद्ध फिर्याद दाखल केली आहे.